व्हायरल होणाऱ्या चिथावणीखोर मेसेजबाबत सरकारकडून व्हॉट्सअॅपला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 10:57 PM2018-07-03T22:57:09+5:302018-07-03T22:57:22+5:30
बेजबाबदार आणि चिथावणीखोर मेसेजना पसरण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजन करण्यात याव्यात, असे आदेश सरकारने व्हॉट्सअॅपला दिले आहेत.
नवी दिल्ली - सोशल मीडियावरून व्हायरल होणारे अफवा पसरवणारे, हिंसा भडकवणारे चिखावणीखोर मेसेज ही चिंताजनक बाब बनली आहे. अशा मेसेजमुळे काही लोकांच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बेजबाबदार आणि चिथावणीखोर मेसेजना पसरण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजन करण्यात याव्यात, असे आदेश सरकारने व्हॉट्सअॅपला दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रतज्ञान मंत्रालयाने व्हॉट्स अॅपला इशारा देताना म्हटले आहे की, फेसबुककडे मालकी हक्क असलेली कंपनी आपली जबाबदारी आणि उत्तरदायित्व टाळू शकत नाही.
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या मेसेजमुळे देशातील विविध भागात जमावाकडून काही लोकांची हत्या झाल्याचे प्रकार घडले होते. त्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपला सरकारकडून हा इशारा देण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रतज्ञान मंत्रालयाने आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटना ह्या दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हणत या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच या घटनांना कारणीभूत असलेल्या मेसेजना रोखण्यासाठी गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली आहे.