'मंदिरात नववर्ष साजरं करायचं नाही, ही आपली संस्कृती नाही'; आंध्र प्रदेश सरकारने केलं परिपत्रक जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 03:20 PM2017-12-25T15:20:51+5:302017-12-25T15:25:52+5:30
आंध्र प्रदेश सरकारने परिपत्रक काढत राज्यातील मंदिरांना नववर्ष साजरं न करण्याचा आदेश दिला आहे. आंध्र प्रदेश सरकारने 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नववर्ष साजरं न करण्याचा आदेशच काढला असून, यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
विजयवाडा - आंध्र प्रदेश सरकारने परिपत्रक काढत राज्यातील मंदिरांना नववर्ष साजरं न करण्याचा आदेश दिला आहे. आंध्र प्रदेश सरकारने 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नववर्ष साजरं न करण्याचा आदेशच काढला असून, यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नववर्ष साजरं करणं आपल्या संस्कृतीचा भाग नसल्याचं सरकारने परिपत्रकात सांगितलं आहे.
आंध्र प्रदेश सरकाराचा देणगी विभाग असणा-या हिंदू धर्म परिरक्षणा ट्रस्टने हे परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, मंदिरांनी नववर्ष साजरं करण्याची काही गरज नाही. तसंच नववर्षाला मंदिरात दर्शनासाठी येणा-या भाविकांनाही शुभेच्छा देण्याची कोणती गरज नाही.
'हिंदू धर्म पंरपरेप्रमाणे लोकांनी तेलगू नववर्ष उगाडीच्या दिवशी मंदिरात जाऊन पाया पडलं पाहिजे. त्याच दिवशी मंदिरांनी नववर्षाचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे', असं परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. परिपत्रकात काही मंदिरं नववर्ष साजरा करत असून, दुस-या दिवशीही ते सुरु ठेवत असल्याची नोंद करण्यात आली आहे. यासोबत नववर्ष साजरा करण्यासाठी फुलांच्या सजावटीसाठी आणि कार्यक्रमांसाठी निधीमधील पैसे वापरणे हिंदू धर्माविरोधात असल्याचंही सांगण्यात आलं आहे. परिपत्रकातून आदेशाचं पालन करण्याची सक्ती करण्यात आली आहे.
'नववर्ष हे इंग्रजी कॅलेंडरमधील कार्यक्रम आहे. पण उगाडी हा आपल्या पंरपरेचा भाग असून त्यात ज्योतिषशास्त्रीय बदल दर्शवले जातात. मंदिरांनी इंग्लिश नववर्ष साजरं न करता उगाडी साजरा करावा', असं एका अधिका-याने सांगितलं आहे.
राज्यात 15 हजाराहून जास्त मंदिरे आहेत. त्यांना ए, बी आणि सी असा दर्जा देण्यात आला आहे. एक कोटीपेक्षा जास्त कमाई करणा-या मंदिरांनी 'ए' दर्जा देण्यात आला आहे. तिरुमला येथील वेंकटेश्वरा मंदिरात मोठ्या प्रमाणात नववर्ष साजरं केलं जातं.