दसऱ्यापूर्वीच ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट; ७८ दिवसांचा पगार बोनस देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 12:06 PM2022-10-03T12:06:55+5:302022-10-03T12:13:38+5:30
देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात रेल्वेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कोरोना महामारीच्या काळातही रेल्वेने अनेक आर्थिक लक्ष्य गाठलं आहे.
नवी दिल्ली - देशात सध्या सण, उत्सावाचा माहोल आहे. त्यात केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वीच मोठी भेट दिली आहे. रेल्वेने अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना (RPF/RPSF कर्मचारी वगळता) ७८ दिवसांच्या पगाराच्या समान बोनस देण्याचा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुमारे ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वीच ही रक्कम खात्यात जमा होणार आहे. रेल्वे दरवर्षी दसरा/पूजेपूर्वी कर्मचाऱ्यांना PLB देते.
कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्यासाठी रेल्वेवर १८३२.०९ कोटी इतका बोजा पडणार आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पीएलबी पेमेंट म्हणून दरमहा ७००० रुपये दिले जातात. ७८ दिवसांनुसार कर्मचार्यांना बोनस म्हणून रु १७,९५१ दिले जातील. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात रेल्वेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कोरोना महामारीच्या काळातही रेल्वेने अनेक आर्थिक लक्ष्य गाठलं आहे. २०२१ मध्ये माल वाहतुकीत १८४ मिलियन टनापर्यंत वाढ झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस प्रोत्साहन कामासाठी दिले जाते.
माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी द्वारा भारतीय रेल के लाखों कर्मचारियों के लिए बोनस को दी गई मंजूरी। रेलवे के करीब 11.27 लाख पात्र अराजपत्रित कर्मचारियों को मिलेगा प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस का लाभ।#ShramevJayatepic.twitter.com/84ij8kQxvx
— Ministry of Railways (@RailMinIndia) October 1, 2022
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्क्यांची वाढ
अलीकडेच सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महगाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेट कमेटी ऑफ इकोनॉमिक अफेयर्सची (CCEA) बैठक आज पार पडली. याच बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती.
३४ वरुन ३८ टक्के झाला महागाई भत्ता
सरकारनं याआधी मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली होती. १ जानेवारी २०२२ पासून याची अंमलबजावणी करण्यात आली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांरुन ३४ टक्के इतका झाला होता. आता यात पुन्हा एकदा ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या डीएची टक्केवारी ३८ टक्के इतकी झाली आहे. याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावर होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"