मिशन@२०२४ : मोदी सरकारने मंत्र्यांकडून मागवले रिपोर्ट कार्ड, स्मृती इराणींना मिळाली 'ही' जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 04:48 PM2023-10-25T16:48:53+5:302023-10-25T16:49:46+5:30
पाच महिन्यांनी होणार्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
नवी दिल्ली : यंदा पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच पूर्ण तयारी केली आहे. पाच महिन्यांनी होणार्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकारने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या सर्व मंत्र्यांच्या कामाचा तपशील मागवला आहे. सरकारच्या वतीने, मंत्र्यांना त्यांच्या संबंधित मंत्रालयांच्या योजना आणि उपलब्धींची संपूर्ण माहिती पाठविण्यास सांगितले आहे, ज्या जनतेशी संबंधित आहेत. केंद्र सरकारने आपल्या सर्व मंत्र्यांना गेल्या पाच वर्षांत आपल्या मंत्रालयाच्या प्रत्येक योजनेतून जनतेला किती फायदा झाला? याचा तपशील पाठवण्यास सांगितले आहे.
मंत्रालयाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लाभ घेतलेल्या लोकांच्या संख्येची आकडेवारीही सादर करावी, असे स्पष्ट निर्देश मोदी सरकारने दिले आहेत. यासोबतच, सरकारने आपल्या मंत्र्यांना जनतेच्या फायद्यासाठी त्यांच्या मंत्रालयात आणखी कोणत्या नवीन योजना आणता येतील अशी विचारणा केली आहे. सरकारने त्याचा मसुदाही मागवला आहे. सरकारने सर्व मंत्र्यांना हे सर्व तपशील लवकरात लवकर पाठवण्यास सांगितले आहे.
स्मृती इराणी यांच्याकडे जबाबदारी
केंद्र सरकारने आपल्या कल्याणकारी योजनांबद्दल जनतेचा अभिप्राय घेण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सर्व मंत्रालयांकडून तपशील प्राप्त केल्यानंतर २०२४ च्या जाहीरनाम्यात आणि सरकारच्या उपलब्धींच्या पुस्तिकेत त्याचा समावेश करणे हा त्यामागील उद्देश आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती इराणी सर्व मंत्र्यांकडून मिळालेला तपशील केंद्र सरकारकडे सुपूर्द करतील, ज्याच्या आधारे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नवीन योजना जाहीर केल्या जातील किंवा त्या जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या जातील.