Coronavirus : तृतीयपंथीयांना सरकारकडून मदत, महिन्याला दीड हजारांचा भत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 04:46 PM2020-05-30T16:46:02+5:302020-05-30T16:46:31+5:30
सामाजिक न्यायमंत्री थावर चंद्र गहलोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, तृतीयपंथीयांना मदत भत्ता देण्यात आल्याची माहिती दिली
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. हातावर पोट असलेल्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. चहाविक्रेते, रिक्षावाले, छोटे-मोठे दुकानदार यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, कामगार वर्गालाही अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. त्याचसोबत, वेश्या वस्तीतील महिला व तृतीयपंथीयांनाही या संकटाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच, तृतीयपंथीय संघटनांनी सरकारकडे पत्र लिहून मदतीची मागणी केली होती. आता, सरकारने तृतीयपंथीयांना मदत देऊ केली आहे.
सामाजिक न्यायमंत्री थावर चंद्र गहलोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, तृतीयपंथीयांना मदत भत्ता देण्यात आल्याची माहिती दिली. ज्यांनी मदतीची मागणी केली होती, त्या तृतीयपंथीय नागरिकांना प्रत्येकी १५०० रुपये प्रतिमाह असा भत्ता देण्यात आल्याचे थावर यांनी सांगितले. देशातील जवळपास ४९२२ नागरिकांच्या खात्यात ७३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
कोविड-19 के दौरान, मंत्रालय ने प्रत्येक ट्रांसजेंडर व्यक्ति को, जिसने मंत्रालय से सहायता मांगी है, 1500 रु.का निर्वाह भत्ता दिया है। देशभर में लगभग 4922 ट्रांसजेंडर व्यक्तियों को लगभग 73 लाख रुपये की राशि प्रत्यक्ष लाभार्थी अंतरण डीबीटी के माध्यम से जारी की गई है। #1YearofModi2
— Thawarchand Gehlot (@TCGEHLOT) May 30, 2020
NBCFDC कडून कोविड १९ दरम्यानच्या लॉकडाऊन कालावधीत सोशल विलगीकरण किंवा इतर कारणास्तव तृतीयपंथीय नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या मानसिक तणावाचा विचार करुन, मानसोपचार तज्ज्ञांकडून त्यांना गाईडलाईन करण्यात येत आहे. देशात १४ एप्रिलपासून हेल्पलाईन जारी करण्यात आल्याचंही थावर यांनी सांगितलं.
तृथीयपंथीय समुहाच्या २ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी गृह, वित्त आणि सामाजिक न्याय विभागाकडे पत्र लिहून विशेष पॅकेज देण्याची मागणी केली होती. देशातील परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत, तृतीयपंथीयांना ३००० रुपये प्रतिमहिना भत्ता देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सरकारने १५०० रुपये भत्ता देऊ केला आहे.