सरकारकडून आरबीआय ताब्यात घेण्याचा प्रयत्न - चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 04:09 AM2018-11-09T04:09:05+5:302018-11-09T04:10:29+5:30
मोदी सरकार आर्थिक संकटावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून असे पाऊल धोकादायक ठरेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे.
कोलकाता : मोदी सरकार आर्थिक संकटावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून असे पाऊल धोकादायक ठरेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला राज्यनिहाय आघाडी फायद्याची ठरेल, असेही त्यांनी सूचित केले.
मोदी यांच्या सरकारने आपले निवडक लोक रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर नेमले असून आपले प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या गळी उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत असे प्रस्ताव पुढे केले जातील. आर्थिक तुटीमुळे सरकार अडचणीत आले असून निवडणूक वर्षात होणाºया खर्चासाठी सरकारला पावले उचलायची आहे. सर्व मार्ग बंद झाल्यामुळे सरकारने रिझर्व्ह बँकेकडे एक लाख कोटींची मागणी केली असल्याचे त्यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले. आरबीआयचे गव्हर्नर यांनी आपली भूमिका ठाम राखल्यामुळे सरकारने रिझर्व्ह बँक कायदा १९३४ च्या कलम ७ नुसार रिझर्व्ह बँकेकडून एक लाख कोटी रुपये आपल्या खात्यात वळते करण्याचा आदेश देण्याचे ठरविले आहे, असा दावाही चिदंबरम यांनी केला.
विविध राज्यांमध्ये आघाड्या व्हाव्या...
राज्यनिहाय आघाड्या काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार असून भाजपच्या पराभवाचा तोच सर्वोत्तम मार्ग आहे, असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले. अलीकडेच कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस- जद आघाडी विजयी झाल्याचा संदर्भ त्यांनी दिला. कर्नाटकमध्ये स्थापन झालेल्या आघाडीचे चांगले फलित मिळाले आहे. विविध राज्यांमध्ये अशा आघाड्या स्थापन केल्या जाव्या, असे त्यांनी येथे काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत नमूद केले.