सरकारी बाबू जाणार आता जंगल सफारीवर
By Admin | Published: October 4, 2015 11:24 PM2015-10-04T23:24:18+5:302015-10-04T23:24:18+5:30
सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये योगा करण्याचा सल्ला यापूर्वी देण्यात आला होता. आता त्यांना जंगलसफारी, नौकानयनासारख्या साहसी क्रीडा प्रकारात सहभागी व्हायचे आहे.
नवी दिल्ली : सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये योगा करण्याचा सल्ला यापूर्वी देण्यात आला होता. आता त्यांना जंगलसफारी, नौकानयनासारख्या साहसी क्रीडा प्रकारात सहभागी व्हायचे आहे. कर्मचाऱ्यांची जोखीम पत्करण्याची क्षमता वाढविण्यासाठी कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने (डीओपीटी) असे अफलातून पत्रक जारी केले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असलेला सुस्तपणा आणि तणावामुळे एकूणच कार्यक्षमतेवर होणारा परिणाम विचारात घेत त्यांना साहसी खेळांमध्ये सहभागी करवून घेण्यावर भर देण्यात आला. कर्मचाऱ्यांचे कार्यालयात गैरहजर राहण्याचे आणि आजारी सुट्या कमी करण्याचे प्रमाण घटविण्यासह उत्पादकता वाढविण्यासाठी कार्यालयांमध्ये जीम उघडण्यासारखे प्रयोगही केले जातील.
सुदृढ कर्मचारी आनंदी राहतात. त्यांच्या सकारात्मकतेमुळे सहकाऱ्यांमध्ये ऊर्जेचा संचार होतो. असे वातावरण ग्राहकांचा आणि अभ्यागतांचा उत्साह वाढविणारे असते. याचा अर्थ जीममध्ये केलेली गुंतवणूक ही एकूणच कामकाज आणि त्या त्या कार्यालयांची प्रतिमा सुधारण्यासाठी लाभदायक ठरू शकते. सरकारी कर्मचारी साहसी खेळ आणि तत्सम मोहिमांमध्ये सहभागी झाल्यास त्यांना निसर्गापासून काही शिकता येईल. त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा समाजाच्या कल्याणासाठी वापर करता येऊ शकतो, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
ट्रेकिंग ते पॅराग्लायडिंग
केवळ साहसी खेळच नव्हे तर ट्रेकिंग, गिर्यारोहण, रॉक- क्लायम्बिंग, अवघड चढ-उतारात सायकलिंग, पॅरासेलिंग, बलूनिंग, पॅराग्लायडिंग, जंगल सफारी, वाळवंट सफारी, नौकानयन, गोताखोरी, बीच ट्रेकिंग यासारख्या विविध साहसी प्रकारांमध्ये सहभाग नोंदवितानाच कर्मचाऱ्यांना पर्यावरण जागृती शिबिरांमध्येही हजेरी लावत निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे.
कर्मचाऱ्यांची जोखीम पत्करण्याची क्षमता वाढविण्यासह सहकार्याची भावना, एक चमू म्हणून एकजुटीने काम, कोणत्याही कामासाठी सज्ज असण्याची क्षमता वाढविणे, आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रतिसाद दिला जाणे या स्वरूपात कर्मचाऱ्यांमध्ये बदल घडून आणण्यासाठी सरकारने हा पुढाकार घेतला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)