सरकारची अट, प्रवाशांसाठी संकट? फायझर आणि मॉडर्ना लसीची खरेदी रोखली जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 01:59 PM2021-09-24T13:59:39+5:302021-09-24T14:00:36+5:30
कोविशील्ड लसीचे निर्माते सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्टोबरमध्ये २२ कोटी डोस उत्पादित करण्याची तयारी दर्शवली आहे.
परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी बॅड न्यूज आहे. फायझर बायोएन्टेक आणि मॉडर्ना या लसींच्या खरेदीला केंद्र सरकारने नकार दर्शवला असल्याचे समजते. या दोन्ही लसींच्या निर्मात्यांनी काही अटींवर भारतात येण्याचे मान्य केले होते. मात्र, कोविशील्ड लसीचे उत्पादन वाढल्याने या दोन्ही लसींची गरज नसल्याचे केंद्राचे मत असल्याचे समजते.
सीरमने उत्पादन वाढवले -
- कोविशील्ड लसीचे निर्माते सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्टोबरमध्ये २२ कोटी डोस उत्पादित करण्याची तयारी दर्शवली आहे.
- भारत बायोटेक या स्वदेशी कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लसीचेही उत्पादन वाढवले जाणार आहे. त्यामुळे फायझर बायोएन्टेक आणि मॉडर्न या दोन लसींना नकार देण्याचे केंद्र सरकारने ठरवल्याचे समजते.
- खासगी कंपन्यांशी फायझर आणि मॉडर्ना करार करून भारतात वितरण करू शकणार आहेत.
सशर्त प्रवेशाला नकार
- भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी फायझर बायोएन्टेक आणि मॉडर्नाच्या निर्मात्यांनी केंद्र सरकारला काही अटी घातल्या होत्या.
- दुर्दैवाने लसीच्या दुष्परिणामामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी लसनिर्माते जबाबदार राहणार नाहीत, त्याचे उत्तरदायित्व केंद्राने स्वीकारावे, असे या कंपन्यांचे म्हणणे होते.
- केंद्र सरकारने या अटी धुडकावून लावल्या होत्या.
प्रवाशांच्या अडचणींत वाढ होणार
फायझर आणि मॉडर्नाच्या प्रवेशबंदीमुळे भारतातून परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांच्या अडचणींत वाढ होणार आहे.
ब्रिटन आणि काही युरोपीय देशांमध्ये फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, ॲस्ट्राझेनेकाची व्हॅक्सझेवरिया या लसींचे डोस घेतलेल्यांनाच लसवंत म्हणून ओळखले जाते.
या अटीमुळे काही पाश्चिमात्य देशांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या आणि कोविशील्ड लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.