ट्रोलिंग प्रकरणी सरकारने थेट उत्तर टाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:38 PM2018-07-24T23:38:37+5:302018-07-24T23:39:58+5:30
सुषमा स्वराज यांना ट्रोल्सनी केले होते लक्ष्य
नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना काही दिवसांपूर्वीच ट्रोल्सनी लक्ष्य केले होते. याबाबत चौकशी करण्यात येत आहे काय? या प्रश्नावर सरकारने थेट उत्तर टाळले. अशा प्रकारच्या तक्रारींवर तपासाचे आदेश देण्यात आले आहेत, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
तृणमूल काँग्रेसचे संसद सदस्य प्रसून बॅनर्जी यांनी याबाबत लेखी प्रश्न उपस्थित केला होता की, सुषमा स्वराज यांना ट्रोल्सनी लक्ष्य केल्याच्या प्रकरणात सरकारने चौकशी केली आहे काय? त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले की, लोकांकडून अशा तक्रारी आल्यानंतर संबंधित एजन्सी त्या पोस्ट हटविण्याबाबत कार्यवाही करतात आणि कायद्यानुसार पुढील कारवाई करतात.
पासपोर्ट सेवा केंद्रातील एका अधिकाऱ्याने आम्हाला अपमानित केले, असा आरोप एका दाम्पत्याने केल्यानंतर विकास मिश्रा या अधिकाºयाची लखनौहून गोरखपूरला बदली करण्यात आली होती. यावर जेव्हा वाद सुरु झाला तेव्हा सुषमा स्वराज फ्रान्स, बेल्जियमच्या दौºयावर होत्या. याच मुद्यावरुन सुषमा स्वराज यांना ट्रोल्सनी लक्ष्य केले होते. सुषमा स्वराज यांनी त्यानंतर व्टिट करत म्हटले होते की, लोकशाहीत वैचारिक मतभेद असू शकतात. कृपया, टीका करा पण, चुकीच्या भाषेत नको. सभ्य भाषेतील टीका अधिक प्रभावी असते.