'सरकारला अर्थव्यवस्थेबद्दल टीका ऐकून घेण्याची इच्छा नाही'; उद्योग विश्वातून नाराजीचे सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 08:13 AM2019-12-02T08:13:39+5:302019-12-02T08:16:35+5:30
उद्योगपती राहुल बजाज यांच्यानंतर किरण मझूमदार शॉ यांची टीका
मुंबई: उद्योगपती राहुल बजाज यांच्यानंतर आता बायोकॉनच्या व्यवस्थापकीय संचालिका किरण मझूमदार शॉ यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विकासदर उंचावण्यासाठी सरकार भारतीय उद्योग विश्वाशी संपर्क साधेल, अशी अपेक्षा शॉ यांनी व्यक्त केली आहे. सरकार उद्योग जगतापासून अंतर राखतंय आणि त्यांना अर्थव्यवस्थेसंदर्भात कोणतीही टीका ऐकून घ्यायची नाही, अशा शब्दांमध्ये शॉ यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.
तत्पूर्वी प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली होती. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व्यासपीठावर असताना त्यांनी सडेतोड शब्दांत भूमिका मांडली. देशात असहिष्णुतेचं वातावरण आहे. त्यावर काही बोलले, टीका केली तर ती योग्य पद्धतीनं घेतली जाणार नाही, अशी भीती कॉर्पोरेट जगताला वाटते. या सर्व परिस्थितीवर आपण मात करायला हवी, असं राहुल बजाज म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वाधिक टीका आमच्यावर झालेली आहे. त्यामुळे कोणीही घाबरायची गरज नाही. हे सरकार अत्यंत पारदर्शीपणे काम करत आहे, असं स्पष्ट केलं.
मुंबईत उद्योग जगतातील एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या या सोहळ्यात मुख्य भाषणानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना सर्व मंत्र्यांनी उत्तरं दिली. त्यावेळी आपल्याला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, पण एक परिस्थिती मांडायची आहे, असं म्हणत राहुल बजाज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. मी जन्मत:च व्यवस्थाविरोधी आहे. आपल्याला आवडणार नाही तरी सांगतो की, माझं राहुल हे नाव जवाहरलाल नेहरू यांनी ठेवलं आहे, अशी प्रस्तावना करत बजाज यांनी नथुराम गोडसे याचा देशभक्त असा उल्लेख झाल्याचा संदर्भ देत खंत व्यक्त केली. त्यावर अमित शहा यांनी, साध्वी प्रज्ञासिंह यांनी याबद्दल खुलासा केला असून संसदेत माफीदेखील मागितली आहे, असं स्पष्ट केलं आहे.
यूपीए दोनच्या काळात सरकारवर आम्ही काहीही टीका करत होतो. पण आता तशी परिस्थिती नाही. सरकारवर केलेली टीका योग्य अर्थानं घेतली जाणार नाही, अशी भीती कॉर्पोरेट जगाला वाटते, हे कोणी बोलून दाखवणार नाही, पण मी सांगतो, असं बजाज म्हणाले. त्यावर शहा यांनी कोणीही टीका करायला घाबरू नये. तशी काही परिस्थिती नाही, असा खुलासा केला.