केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यास केंद्राची मंजुरी दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 02:44 PM2021-10-21T14:44:32+5:302021-10-21T14:46:49+5:30
मोदी सरकारच्या निर्णयानंतर आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना 31% महागाई भत्ता मिळेल.
नवी दिल्ली: मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी दिवाळीची भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयाचा 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्राच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर लवकरच याची अधिकृत घोषणा करतील. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महागाई भत्त्यात 3% वाढ झाल्याननंतर 7व्या वेतन आयोगानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक सॅलरीवर 31% DA मिळेल.
आजच्या वाढीनंतर आता DA 31 टक्के असेल. या वर्षी जुलैमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई आराम (DR) दर 11 टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यासह डीएचा नवीन दर 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला. त्याचबरोबर, आज DA मध्ये तीन टक्के वाढ झाल्यामुळे, DA चा नवीन दर 31 टक्के झाला आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाचा 31 टक्के महागाई भत्ता मिळेल.
DA कोणत्या आधारावर ठरवला जातो?
कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या आधारावर महागाई भत्ता दिला जातो. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वेगळा आहे. महागाई भत्त्याची गणना मूळ पगारावर केली जाते. महागाई भत्त्याच्या गणनेसाठी एक सूत्र निश्चित केले गेले आहे, जे ग्राहक किंमत निर्देशांकाद्वारे निर्धारित केले जाते.
महागाई भत्ता म्हणजे काय?
सरकारी कर्मचाऱ्यांचे राहणीमान आणखी सुधारण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. वाढत्या महागाईनंतरही कर्मचाऱ्याच्या राहणीमानावर कोणत्याही प्रकारे परिणाम होऊ नये, म्हणून तो वेळोवेळी वाढवला जाता. हा भत्ता सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो.