कार्यालयात योगासनांची सरकारी कर्मचाऱ्यांना मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 06:03 AM2021-09-05T06:03:40+5:302021-09-05T06:04:03+5:30
केंद्राची योजना; वाय-ब्रेक ॲप करा डाऊनलोड
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये दररोज पाच मिनिटे योगासने करण्याची मुभा मोदी सरकारने दिली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वाय-ब्रेक ॲप डाऊनलोड करण्याच्या सूचना केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. योगासने केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे तसेच ही योगासने कशी करावीत, याबद्दलची माहिती या ॲपमध्ये देण्यात आली आहे.
केंद्रीय आयुष मंत्रालयाने वाय-ब्रेक ॲप विकसित केले आहे. कार्यालयीन काम करताना कर्मचारी ताजेतवाने असावेत, असे मोदी सरकारला वाटते. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम असायला हवे. याकरिताच कार्यालयात रोज पाच मिनिटे योगासने करण्यास कर्मचाऱ्यांना सरकारने सांगितले आहे.
वाय-ब्रेक ॲपचा जास्तीत जास्त प्रसार करावा, असा आदेश केंद्राच्या सर्व खात्यांना देण्यात आला आहे. २ सप्टेंबर रोजी त्याबद्दलचा आदेश जारी करण्यात आला. त्याच्या एक दिवस आधी आयुष मंत्रालयाने वाय-ब्रेक ॲपचे अनावरण केले होते. या समारंभाला केंद्रीय कार्मिक खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह सहा केंद्रीय मंंत्री उपस्थित होते. त्यावेळी या मंत्र्यांनीही वाय-ब्रेक ॲपच्या माध्यमातून योगासने केली होती.
ही आहेत वाय-ब्रेक ॲपची वैशिष्ट्ये
n सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच कॉर्पोरेट जगतातील लोकही सतत कामात व्यग्र असतात. त्यावेळी येणारा तणाव दूर करण्यासाठी योगासने, प्राणायाम, ध्यान अत्यंत उपयोगी आहे, असे या वाय-ब्रेक ॲपमध्ये म्हटले आहे.
n दिल्ली, मुंबई, चेन्नई यासह सहा प्रमुख महानगरामध्ये वाय-ब्रेक ॲपच्या वापराचा पथदर्शी प्रकल्प २०२० मध्ये राबविण्यात आला होता. तो यशस्वी ठरल्यानंतर आता हे ॲप खुले करण्यात आले आहे.