देशव्यापी संपात शासकीय कर्मचाऱ्यांची उडी; संबंधित कार्यालयाबाहेर निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 01:31 AM2019-01-05T01:31:22+5:302019-01-05T01:31:37+5:30
राज्यात ५० हजारांहून अधिक कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी काम बंद करून पूर्ण दिवस संबंधित कार्यालयाबाहेर निदर्शने करतील.
मुंबई : देशातील प्रमुख ११ केंद्रीय कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये सक्रियपणे सामील होण्याचा निर्णय २००५नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांच्या जुनी पेन्शन हक्क संघटनेनेही घेतला आहे. या संपात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया संघटनेचे जनसंपर्क प्रमुख प्राजक्त झावरे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
याशिवाय राज्यातील हमाल-मापाडीही संपात उतरणार असल्याने संपाची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवृत्त सरकारी कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत़
कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनासह शासकीय कर्मचाºयांच्या जुन्या पेन्शनसाठी व कामगार कायद्यांतील बदलांविरोधात केंद्रीय कामगार संघटनांनी या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यामधील जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर राज्यात लढणाºया जुनी पेन्शन हक्क संघटनेने संपात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे जनसंपर्क प्रमुख प्राजक्त झावरे-पाटील म्हणाले की, राज्यात ५० हजारांहून अधिक कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी काम बंद करून पूर्ण दिवस संबंधित कार्यालयाबाहेर निदर्शने करतील.
संपात हमाल-मापाडींची उडी
महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाने कामगार कायद्यातील बदलांविरोधात या संपात सक्रियपणे सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. लेखी आश्वासन दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी सरकार करत नसल्याने महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या सर्व संघटनांच्या कृती समितीला तीन वेळा संप पुकारावा लागला. परिणामी, सरकारने प्रस्तावित केलेले कामगारविरोधी व मालकधार्जिणे बदल तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संपात उतरण्याचा निर्णय महामंडळाने जाहीर केला आहे.