सरकारी कर्मचा-यांनी शुक्रवारी खादी घालण्याचा प्रस्ताव
By admin | Published: March 9, 2016 01:11 PM2016-03-09T13:11:31+5:302016-03-09T13:11:31+5:30
केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दर शुक्रवारी ऑफीसमध्ये खादीचे कपडे घालावेत असा प्रस्ताव आणण्याचा विचार सरकार करत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ९ - सरकारी कर्मचारी आता प्रत्येक शुक्रवारी खादी कपड्यांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दर शुक्रवारी ऑफीसमध्ये खादीचे कपडे घालावेत असा प्रस्ताव आणण्याचा विचार सरकार करत आहे. केंद्र सरकारने सध्या केवळ प्रस्ताव दिला असून यासाठी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नसणार आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने सरकारकडे केंद्रीय कर्मचा-यांनी आठवड्यातून एकदातरी खादी कपडे घालावेत असा विचार मांडला आहे. यामुळे देशातील खादी उद्योगाला चालना मिळेल ही यामागची संकल्पना आहे. सरकार लवकरच हा प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहे.
'आम्ही सरकारशी या विषयावर चर्चा करुन आवाहन करणार आहोत. कर्मचारी फक्त एक दिवस खादी कपडे घालू शकतात' अशी माहिती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे चेअरमन व्ही के सक्सेना यांनी दिली आहे. प्रत्येकाने जरी खादीचा एक कपडा खरेदी केला तरी विक्रीत केवढी वाढ होईल असं मत एका अधिका-याने नोंदवलं आहे. केंद्रीय कर्मचा-यांची संख्या 35 लाख आहे ज्यामध्ये रेल्वे आणि संरक्षण खात्याच्या कर्मचा-यांचा समावेश नाही. कर्मचा-यांनी देखील या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. मी अनेकदा खादीची साडी घालते यात काही मोठी गोष्ट नाही असं एका महिला अधिका-याने म्हणलं आहे.