सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी गिफ्ट! सीएम केजरीवाल यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 11:51 AM2023-11-06T11:51:30+5:302023-11-06T11:51:53+5:30
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिवाळी निमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे.
दिल्ली सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट दिलं आहे. यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे.यावेळी ग्रुप बी आणि सी च्या कर्मचाऱ्यांनाही बोनस दिला जाणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्ली सरकारच्या सर्व कर्मचारी माझा परिवार आहे, सणांच्या या महिन्यात आम्ही दिल्ली सरकारी कर्मचाऱ्यांना सात हजार रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिवाळीचा हंगाम सुरू आहे. दिल्ली सरकारच्या सर्व ग्रुप बी आणि सी ग्रेड कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा सरकारने केली आहे. दिल्ली सरकारच्या ८० हजार कर्मचाऱ्यांना बोनस दिला जाणार आहे. यासाठी ५६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा बोनस देण्यासाठी ५६,००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
यापूर्वी दिल्ली सरकारने महामंडळाच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना पक्के केले होते. दिवाळीपूर्वी पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले. महामंडळाच्या सफाई कर्मचाऱ्यांना सरकारने दिवाळीपूर्वी भेटवस्तू दिल्या. पाच हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले असून ३१०० डीबीसी कर्मचाऱ्यांना मल्टी टास्क स्टाफ करण्यात आले आहे. याशिवाय स्वच्छता यंत्रणा बळकट करण्यासाठी आणि कचऱ्याचे डोंगर हटवण्यासाठी समांतर एजन्सी स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हे सर्व प्रस्ताव मंगळवारी सभागृहात मंजूर करण्यात आले. स्थायी समिती स्थापन झाल्यानंतर हे प्रस्ताव पुढे नेले जातील, असे महापौरांनी सांगितले.