जम्मू- काश्मीरमध्ये व्हॉट्सअॅप कॉलिंग सर्व्हिस बंद होणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 08:30 AM2018-06-12T08:30:51+5:302018-06-12T08:30:51+5:30
कॉलिंगसाठी इंटरनेटचा वापर वाढल्याने सुरक्षा यंत्रणांसमोरील आव्हान वाढलं आहे.
नवी दिल्ली- केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरसारख्या अशांत शहरात व्हॉट्सअॅप कॉलिंग सर्व्हिस बंद केली जाण्याची शक्यता आहे. दहशतवादी सीमेपलिकडे असलेल्या त्यांच्या प्रमुखांशी व्हॉट्सअॅप कॉलिंग सर्व्हिसच्या माध्यमातून संपर्कात असतात, अशी माहिती समोर येते आहे. त्यामुळे लवकरच सरकारकडून तिथे ही सेवा बंद करण्यासाठी पावलं उचलली जाऊ शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते आहे.
गृहसचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. या बैठकीत 2016 साली नगरोटा आर्मी कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासी संबंधीत नुकत्याच झालेल्या अटकेवर मुख्यत्वे चर्चा झाली. या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जैश-ए-मोहम्महच्या दहशतवाद्याने व्हॉट्सअॅप कॉलिंगच्या माध्यमातून सीमेपलिकडे बसलेल्या प्रमुखांशी बोलत असल्याची माहिती पोलिसांना दिली. नगरोटा कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले होते. राष्ट्रीय तपास पथकाने नुकतीच या हल्ल्यात कथितपणे मदत करणाऱ्या तीन जणांची पोलिसांकडून कस्टडी घेतली. या तिघांनी दहशतवाद्यांना सीमेपासून कॅम्पपर्यंत पोहचविण्यास मदत केली, असा आरोप केला जातो आहे.
कॉलिंगसाठी इंटरनेटचा वापर वाढल्याने सुरक्षा यंत्रणांसमोरील आव्हान वाढलं आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं बोलणं ट्रेस करणं कठीण होत आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत काही आखाती देशांचं उदाहरण समोर ठेवण्यात आलं. जिथे व्हॉट्सअॅप वॉइस कॉलिंगला परवानगी नाही.