देशातील ८६% महात्मा गांधी अध्यासने बंद, गांधीजींच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 10:21 AM2018-07-09T10:21:28+5:302018-07-09T10:23:28+5:30
गांधीवादाच्या अभ्यासाची स्थिती अत्यंत काळजी करायला लावणारी आहे.
नवी दिल्ली- केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीसाठी तयारी करत असले तरी गांधीवादाच्या अभ्यासाची स्थिती अत्यंत काळजी करायला लावणारी आहे. देशातील ८६% गांधी अध्यासने कार्यरत नसल्याची आकडेवारी स्पष्ट झाली आहे.
देशभरातील विविध संस्थांमध्ये १३७ गांधी अध्यासनांना मंजूरी मिळालेली आहे. मात्र त्यातील केवळ १९ अध्यासनांचे काम सुरु आहे. इतकेच नव्हे कर वर्धा येथील केंद्र सोडल्यास गेल्या दशकभरात सर्वच केंद्रांमध्ये गांधीवादाचा अभ्यास करणारे विद्यार्थी व संशोधक यांची संख्या रोडावली आहे. सांस्कृतीक कार्य मंत्रालयाने २२ जून रोजी पंतप्रधान कार्यालयात झालेल्या बैठकीत ही माहिती समोर आणली.
महात्मा गांधीजी यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. युवकांना त्यांच्या आजच्या काळाशी अनुरुप अशा पद्धतीत या विचारांची मांडणी करुन गांधीजींचे विचार समजावेत यासाठी प्रयत्न होत आहेत. विकीपिडियाप्रमाणे गांधीविचारांसाठी वाहिलेले एक गांधीपिडिया नावाने पेज सुरु केले जाणार आहे. वर्षभरात गांधीजींच्या संदर्भातील महत्त्वाच्या तारखांना शाळा, महाविद्यालये, सिनेम्गृगांमध्ये "वैष्णव जनतो तेणे रे कहिये" गायले प्रसारित करण्याचीही योजना आहे.