सरकारला इंदिरा गांधींचाच विसर; काँग्रेसची मोदी सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 06:11 AM2021-12-17T06:11:46+5:302021-12-17T06:12:18+5:30
आज केंद्र सरकार इंदिरा गांधींचे नावही घ्यायला तयार नाही, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांची टीका.
नवी दिल्ली : भारताने १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला पराभूत करून, त्याचे दोन तुकडे पाडले आणि बांगलादेश निर्माण केला, त्यास ५० वर्षे होत असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या नावाचा उल्लेख करण्याचे सौजन्यही केंद्र सरकार दाखवत नाही. सरकारची ही संकुचित वृत्ती अतिशय दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
त्या विजयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त देशात कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्ती वाहिनीला मदत आणि बांगलादेशची निर्मिती हे सर्व निर्णय इंदिरा गांधी यांनीच घेतले होते. त्या युद्धानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक विरोधकांनी इंदिरा गांधी यांना देवी दुर्गा म्हटले होते. मात्र आज केंद्र सरकार इंदिरा गांधींचे नावही घ्यायला तयार नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
यांना बलिदान माहीत नाही
राहुल गांधी यांनी उत्तराखंडात १९७१ च्या युद्धात सहभागी अधिकाऱ्यांचा सत्कार केला. प्रत्येक गोष्टीचे इव्हेंट करू पाहणारे मोदी यांना सैनिकांच्या बलिदानाचे महत्व कळणार नाही. इंदिरा गांधी यांचे नाव घेण्याचे सौजन्य त्यांच्यात नाही. ज्या महिलेने देशाच्या ऐक्यासाठी अंगावर ३२ गोळ्या झेलल्या, तिच्याविषयी भाजपला साधा आदरही नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.