राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवली, मग मशिदीसाठी का नाही? शरद पवार यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 10:49 AM2020-02-20T10:49:58+5:302020-02-20T10:59:50+5:30
Sharad Pawar : भाजपा हा धार्मिक आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, शरद पवार यांचा गंभीर आरोप
लखनौ - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवण्यात आली, मग मशिदीसाठी ट्रस्टची स्थापना का करण्यात आली नाही? अशी विचारणा शरद पवार यांनी केली आहे. तसेच सरकारने अयोध्येत मशीद बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.
पक्षाच्या राज्य संमेलनात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लखनौच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी राम मंदिरासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टबाबत आपले मत मांडले. ' भाजपा हा धार्मिक आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. जर केंद्र सरकार राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना करू शकते. तर अजून एका ट्रस्टची स्थापना करून मशीदीसाठी निधी का देऊ शकत नाही,' असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावरही शरद पवार यांनी टीका केली. ''उत्तर प्रदेश सरकारने पुढील वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही तरतूद केलेली नाही. येथील सरकारने तरुणांना एक ठरावीक रक्कम देण्याची घोषणा केली आहे. मात्र हा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत शंकाच आहे. सध्या तरुणांना काम मिळणे गरजेचे आहे,'' असे ते म्हणाले.
संबंधित बातम्या
राम मंदिर उभारणीला १५ दिवसांत येणार वेग, २0२४ पर्यंत मंदिर पूर्ण?
महंत नृत्यगोपाल बनले राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष
'त्या' जमिनीवर कब्रस्तान, राम मंदिर ट्रस्टला मुस्लिमांचे पत्र
राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ओबीसींना ट्रस्टमधून वगळणे चूक : उमा भारती
अयोध्येतील वादग्रस्त भूमीवर राम मंदिर होते, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तसेच तिथे राम मंदिर बांधण्यासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा संसदेत केली होती. त्यानंतर बुधवारी या ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाला होती. या बैठकीत महंत नृत्य गोपाल यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती.