सरकार स्थापन करण्याआधी मतैक्य हवे, एनडीएचा मित्रपक्ष अजसूने व्यक्त केले मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 04:35 AM2019-11-27T04:35:39+5:302019-11-27T04:36:19+5:30
महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर अजसूचे मुख्य प्रवक्ते देवदर्शन भगत म्हणाले की, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचे असते. बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा पहिला हक्क मिळावा.
रांची : अडचणीची स्थिती टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्याआधी मतैक्य करायला हवे, असे मत झारखंडमधील भाजपप्रणीत एनडीए सरकारमधील अखिल झारखंड स्टुडंट युनियन (अजसू) या मित्र पक्षाने े केले आहे.
महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर अजसूचे मुख्य प्रवक्ते देवदर्शन भगत म्हणाले की, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचे असते. बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा पहिला हक्क मिळावा.
जनतेने दिलेल्या कौलाचा आदर केला जावा. तत्त्व, विचारधारा वेगवेगळ्या असलेल्या पक्षांनी सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याआधी सहमती घेतली पाहिजे; जेणेकरुन ऐनवेळी अडचण निर्माण होणार नाही. सरकार चालविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आवश्यक बाबीं अगोदर निश्चित केल्या गेल्या पाहिजेत, असे भगत यांनी सांगितले. १९ वर्षांपूर्वी झारखंडची निर्मिती झाल्यापासून अखिल झारखंड स्टुडंट युनियन (अजसू) पहिल्यांदाच स्वबळावर झारखंड विधानसभेची निवडणूक लढवित आहे. झारखंडची निर्मिती होण्याआधी स्थापन झालेल्या अखिल झारखंड स्टुडंट युनियनने (अजसू) सुरुवातीपासून राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केलेली आहे. ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबरदरम्यान पाच टप्प्यांत झारखंडमध्ये विधानसभेसाठी निवडणूक घेण्यात येणार असून २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यांत विविध राजकीय पक्षांचे २६० उमेदवार रिंगणात आहेत. दुसºया टप्प्यात २० जागांसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
आठ कोटींची रोकड जप्त...
दरम्यान, निवडणुकीची घोषणा झाल्यापासून झारखंडमध्ये २५ नोव्हेंबरपर्यंत ८ कोटी ३३ लाख ५३ हजार ९५८ रुपयांची रोकड , तसेच अवैध दारू, गांजासह अनेक साहित्य-सामग्री जप्त करण्यात आली. याप्रकरणी ६६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य निर्वाचन अधिकारी विनय कुमार चौबे यांनी मंगळवारी दिली.