२५ कोटी लोकांच्या जीवनात सरकारने घडविले गुणवत्तापूर्ण बदल : पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 09:07 AM2023-10-01T09:07:36+5:302023-10-01T09:08:23+5:30
‘संकल्प सप्ताहा’स थाटात प्रारंभ, २ लाख नागरिकांची उपस्थिती
नवी दिल्ली : ११२ जिल्ह्यांत बदल घडविणारा ‘महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम’ हाच ‘महत्त्वाकांक्षी गट कार्यक्रमा’चा आधार असेल, तसेच त्याचे मूल्यांकन करण्यासाठी पुढील वर्षी मी पुन्हा येईन, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. ‘महत्त्वाकांक्षी गट कार्यक्रमा’च्या अंमलबजावणीसाठी हाती घेण्यात आलेल्या ‘संकल्प सप्ताहा’चे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
‘भारत मंडपम’मध्ये आयोजित मोदी म्हणाले की, या कार्यक्रमाने ११२ जिल्ह्यांतील २५ कोटींपेक्षा अधिक लोकांच्या जीवनात गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणला. हे जिल्हे ‘प्रेरणादायी जिल्हे’ बनले आहेत. आगामी एक वर्षात ५०० गटांपैकी किमान १०० गट हे ‘प्रेरणादायी गट’ बनतील.
३ हजार पंचायतींचे प्रतिनिधी
या कार्यक्रमात देशातील ३ हजार पंचायती आणि गटांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि सरकारी अधिकारी यांनी सहभाग नोंदवला.
गट व पंचायत स्तरावरील पदाधिकारी, शेतकरी आणि स्थानिक लोकांसह सुमारे २ लाख लोक या कार्यक्रमात आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातून सहभागी झाले होते. अनेकांना सभास्थानी स्टॉल्सही लावले होते.