Crude Palm Oil: सुखवार्ता! खाद्यतेलाच्या किमती कमी होणार, सरकारनं पामतेलावरील आयात शुल्कात केली मोठी कपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 11:00 IST2021-09-11T10:58:45+5:302021-09-11T11:00:44+5:30
खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी घट करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे.

Crude Palm Oil: सुखवार्ता! खाद्यतेलाच्या किमती कमी होणार, सरकारनं पामतेलावरील आयात शुल्कात केली मोठी कपात
नवी दिल्ली-
खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी घट करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. सरकारनं आयात शुल्क तब्बल ५.५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात देशातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारकडून गेल्या महिन्यात देखील खाद्य तेलावरील आयात शुल्कात घट करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात खाद्य तेलाच्या किमतीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारनं ३० सप्टेंबरपर्यंत कच्च्या पाम तेलावरील (Crude Palm Oil- CPO)आयात शुल्क ३०. २५ टक्क्यांवरुन २४.७ टक्के इतकं केलं आहे. तर रिफाइंड पाम तेलावरील आयात शुल्क ४१.२५ टक्क्यांवरुन ३५.७५ टक्क्यांवर आणलं आहे. रिफाइंड सोया तेल आणि सनफ्लावर तेलावरील आयात शुल्क देखील ३० सप्टेंबरपर्यंत ४५ टक्क्यांवरून ३७.५ टक्के इतकं करण्यात आलं आहे.
खाद्यतेलाची साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कारवाई
खाद्य तेलाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तेलाची साठवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा सरकारनं दिला आहे. देशातील सर्व खाद्य तेल उत्पादक कंपन्या आणि होलसेल व्यापाऱ्यांकडून तेलाची साठेबाजी केली जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केंद्रातील राज्य सरकारांना दिल्या आहेत.