देशांतर्गत विमान प्रवासासाठी आता सरकारी ओळखपत्र बंधनकारक; केंद्र सरकार जाहीर करणार नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 01:51 PM2017-09-07T13:51:54+5:302017-09-07T13:58:39+5:30
विमानाने देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर आता प्रवाशाकडे सरकारी ओळखपत्र असणं गरजेचं आहे.
नवी दिल्ली, दि. 7- विमानाने देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर आता प्रवाशाकडे सरकारी ओळखपत्र असणं गरजेचं असणार आहे. देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना (ड्राइव्हिग लायसन्स), पासपोर्ट किंवा पॅन कार्ड क्रमांक यापैकी एका ओळखपत्राचा क्रमांक देणं बंधनकारक असणार आहे. ८ सप्टेंबर रोजी केंद्र सरकार यासंदर्भातील नियम जाहीर करणार आहे. यामध्ये मतदान ओळखपत्राचा क्रमांकही चालू शकतो, पण त्याबाबतचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.
भारतात सुरक्षेच्या दृष्टीने ‘नो फ्लाय लिस्ट’ तयार करण्यात येत असून, हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर अनेक देशांमध्ये अशा प्रकारचा नियम करण्यात आला आहे. या नवीन नियमामुळे एका व्यक्तीच्या तिकीटावर दुसरा व्यक्ती प्रवास कऱण्याच्या घटना रोखल्या जाऊ शकतील, असं केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम मंगोलिया येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्लोबल रेग्युलेटर्स’च्या बैठकीला उपस्थित होती. त्याठिकाणी हा निर्णय घेण्यात आल्याचंही जयंत सिन्हा म्हणाले आहेत.
'नो फ्लाय'च्या नियमांबाबत आमच्याकडे काही सूचना आल्या होत्या. त्याबाबत योग्य तो विचार करुन देशांतर्गत प्रवासाबाबतचे नवीन नियम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती जयंत सिन्हा यांनी दिली आहे. याशिवाय देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकिट काढताना आधार कार्ड क्रमांक देणाऱ्या प्रवाशांना लवकर डिजिटल बोर्डिंग पास देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांना देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट काढताना यापुढे सरकारी ओळखपत्र स्वतःकडे ठेवणं बंधनकारक असणार आहे.