काश्मिरी युवकाला जीपला बांधणा-या लष्करी अधिका-याचे मोदी सरकारने केले समर्थन
By admin | Published: April 17, 2017 08:41 AM2017-04-17T08:41:58+5:302017-04-17T08:51:40+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जीपला एका युवकाला बांधल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 17 - जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जीपला एका युवकाला बांधल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी काश्मिरी युवकाचा मानवी ढालीसारखा वापर करणा-या लष्करी अधिका-याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. 9 एप्रिलला ही घटना घडली. लष्कराने केलेल्या चौकशीची सरकारने दखल घेतली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दगडफेक करणा-या जमावापासून संपूर्ण युनिटचा बचाव करण्यासाठी कमांडींग अधिका-याने हा निर्णय घेतल्याचे चौकशीतून समोर आले. इलेक्शन डयुटीवर असलेले जम्मू-काश्मीरमधील अधिकारी, कर्मचारी आणि जवानांना दगडफेक करणा-या जमावापासून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी या युवकाला जीपला बांधले.
कमांडीग अधिका-याला नाखुषीने हा निर्णय घ्यावा लागला. त्याच्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता. दगडफेक करणा-या जमावाने वेढल्याने हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे केंद्र सरकारने त्या अधिका-याच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना जमावाकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली. त्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काश्मिरी युवकाला जीपला बांधल्याचा व्हिडीओ आणि फोटो टि्वट करुन काश्मीरमधली दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान लष्कराच्या गाडीला युवकाला बांधल्या प्रकरणी बीरवाह येथील पोलिस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. लष्कराच्या जीपला बांधलेल्या तरुणाचे नाव फारुख अहमद आहे. इंडियन एक्स्प्रेसने या तरुणापर्यंत पोहोचत त्याला संपूर्ण वादावर प्रतिक्रिया विचारली. यावर त्याने मी आपल्या जीवनात कधीच दगडफेक केलेली नाही. मी दगडफेक करणा-यांपैकी नसून छोटी, मोठी कामं करुन आपलं पोट भरतो", असं त्याने सांगितलं आहे. फारुखच्या कुटुंबात तो आणि त्याची म्हातारी आई आहे.