सरकार लोकशाहीचा गळा घोटतेय : सोनिया गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 05:33 AM2023-12-21T05:33:24+5:302023-12-21T05:33:36+5:30
काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत संसदेबाहेर आपले मत व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी संसदेतील १४३ विरोधी सदस्यांच्या निलंबनावरून बुधवारी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत संसदेबाहेर आपले मत व्यक्त केले. यापूर्वी कधीही इतक्या विरोधी खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले नव्हते आणि तेही केवळ न्याय्य मागणीसाठी.
त्या म्हणाल्या की, १३ डिसेंबरला जे घडले ते अक्षम्य आहे. सभागृहात फलक झळकावल्याबद्दल आणि घोषणाबाजी केल्याबद्दल गेल्या काही दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेतून एकूण १४३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. संसदेच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी इंडिया आघाडीचे खासदार करत आहेत.
बेरोजगारीवर चर्चा का होत नाही : राहुल गांधी
तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभापती धनखड यांची नक्कल केल्याच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षांच्या सुमारे १५० खासदारांना संसदेबाहेर काढण्यात आले; पण त्यावर कोणतीही चर्चा माध्यमांमध्ये होत नाही. बेरोजगारीवर चर्चा होत नाही. राफेलसह अनेक मुद्द्यांवर चर्चा होत नाही.
मी आरोप केला तर ते योग्य होईल का?...
प्रत्येक गोष्टीत कोणीही जातीचा ओढूनताणून संबंध आणू नये. मागासवर्गीय असल्याने मला राज्यसभेत अनेकदा बोलू दिले जात नाही, असा मी आरोप केला तर ते योग्य होईल का?. माझी नक्कल करून जाट असल्याचा अवमान केला आहे, असा आरोप उपराष्ट्रपती धनखड यांनी केला होता. अशी विधाने करणे योग्य आहे का.
-मल्लिकार्जुन खरगे, पक्षाध्यक्ष, काँग्रेस