ऑनलाईन शॉपिंग करणं आता होणार अधिक सोपं, कसं ते जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 09:29 AM2019-06-05T09:29:59+5:302019-06-05T09:36:30+5:30
ऑनलाईन शॉपिंग करणं अधिक सोपं होणार असून त्यामध्ये येणाऱ्या समस्या दूर होणार आहेत. ग्राहकांना शॉपिंग करताना अनेकदा पैसे रिफंड आणि प्रोडक्ट रिटर्न किंवा एक्सचेंजसारख्या गोष्टींसाठी काही अडचणींचा सामना करावा लागतो.
नवी दिल्ली - ऑनलाईन शॉपिंग करण्याकडे सध्या कल वाढलेला दिसत आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची खरेदी ही डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांतच करता येते. त्यामुळे खरेदीसाठी जास्त वेळ खर्च करावा लागत नाहीत. लवकरच ऑनलाईन शॉपिंग करणं अधिक सोपं होणार असून त्यामध्ये येणाऱ्या समस्या दूर होणार आहेत. ग्राहकांना शॉपिंग करताना अनेकदा पैसे रिफंड आणि प्रोडक्ट रिटर्न किंवा एक्सचेंजसारख्या गोष्टींसाठी काही अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता सरकार ऑनलाईन शॉपिंगसंदर्भात नवी नियमावली आणत असल्याने त्याचा ग्राहकांना फायदा होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन शॉपिंग संदर्भात सरकारने 100 दिवसांत नवीन नियमावली तयार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. तसेच सरकारने सर्व महत्तपूर्ण गोष्टींचा विचार करून 100 दिवसांचा अजेंडा तयार केला आहे. ड्राफ्ट तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याला अंतिम स्वरूप देण्याचं काम सध्या सुरू आहे. ई कॉमर्स कंपनींसाठी लवकरच ई एक्स्चेंज, रिफंड, रिटर्नची नियमावली प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासोबत ग्राहक मंचाचे देखील आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
कंज्यूमर अफेयर्स सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन शॉपिंगसाठी नवीन नियमावली लवकरच येणार आहे. यामुळे रिटर्न, एक्स्चेंज, रिफंड यामध्ये पारदर्शकता राहील. ग्राहकांची शॉपिंग करताना या नव्या नियमावलीमुळे फसवणूक होणार नाही. यासाठी 100 दिवसांचा अजेंडा तयार करण्यात आला आहे. सगळ्या ग्राहक मंचाचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ऑनलाईन शॉपिंग करताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा
ऑनलाईन शॉपिंग करणं थोडं धोकादायक आहे. शॉपिंग करताना एखादी छोटीशी चूक झाली तरी ती खूप महागात पडू शकते. ऑनलाईन शॉपिंग करताना आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. पैशाचे व्यवहार ऑनलाईन करताना वैयक्तिक संगणक किंवा लॅपटॉपचा वापर करा. कारण इतर व्यक्तींच्या साधनांचा वापर केल्यास बऱ्याचवेळा महत्त्वाचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे शॉपिंग करताना प्रामुख्याने तुमच्या उपकरणांचा वापर करा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा बँकिंगचे डिटेल्स कधीही जीमेल किंवा गुगल ड्राइव्हवर सेव्ह करू नका. कारण जीमेल अकाउंट हॅक करून फसवणूक केली जाण्याची शक्यता अधिक असते. तसेच गुगल अकाउंटला मोबाइल नंबर आणि काही महत्वाचे डिटेल्स सिंक केलेले असतात. त्यामुळे हॅकर हे डिटेल्स वापरून इतर व्यवहार करू शकतात. बँकेतून फोन केला असून तुमच्या बँक खात्याची माहिती द्या असे सांगणारे अनेक फोन हे येत असतात. मात्र अशा फोनला प्रतिसाद देऊ नका. त्याचप्रमाणे फोनवर मेसेज अथवा ई-मेलच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीशी कार्डचे डिटेल्स शेअर करू नका.