१ जानेवारीपासून मुलाखत न देता मिळेल सरकारी नोकरी!

By admin | Published: October 25, 2015 01:10 PM2015-10-25T13:10:07+5:302015-10-25T13:35:33+5:30

सरकारी नोकरीतील छोट्या पदांसाठी १ जानेवारी २०१६ पासून मुलाखती घेण्यात येणार नाहीत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमादरम्यान केली.

Government job without getting interview from 1st January! | १ जानेवारीपासून मुलाखत न देता मिळेल सरकारी नोकरी!

१ जानेवारीपासून मुलाखत न देता मिळेल सरकारी नोकरी!

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - सरकारी नोकरीतील छोट्या पदांसाठी १ जानेवारी २०१६ पासून मुलाखती घेण्यात येणार नाहीत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमादरम्यान केली. येत्या जानेवारी महिन्यापासून बी, सी व डी श्रेणीतील केंद्र सरकारच्या नोक-यांसाठी मुलाखती अट रद्द करण्यात आल्याची महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. एक किंवा दोन मिनिटांच्या मुलाखतीत समोरील व्यक्तीची संपूर्णपणे पारख केल्याचे माझ्या ऐकीवात तरी आले नाही, त्यामुळे छोट्या-छोट्या नोक-यांसाठी मुलाखतीचा फार्स नको, असे ते म्हणाले. मात्र कोणाच्याही शिफारसीवरून या नोक-या देण्यात येणार नसल्याचेही मोदींनी स्पष्ट केले. 
आज सकाळी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदींनी  देशातील जनतेशी १३ व्यांदा संवाद साधला. भाषणाच्या सुरूवातीसच त्यांनी टीम इंडिया व दक्षिण आफ्रिकेला आजच्या पाचव्या व निर्णायक सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.  जनतेशी संवाद साधताना आज पंतप्रधानांनी अवयव दानाचे महत्व विशद केले. केरळमधील शाळेतील मुलींनी पत्र लिहून अवयवदान मोहिमेबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली होती. त्या मोहिमेला आजच्या भाषणातून प्रोत्साहन देत मोदींनी देशातील जनतेला मरणोत्तर अवयव दान करण्याचे आवाहन केले. 
अवयव दान हे महादान असून तो एक महत्वाचा मुद्दा आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील वसंतराव सुरुके गुरुजींच्या अवयव दानाच्या मोहिमेचे कौतुक केले. अवयव दान, महादान असून, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अवयव दान मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी #NOTTO ची स्थापना करण्यात आली असून १८००११४७७० या हेल्पलाईनवर अवयवदानासाठी नोंदणी करता येईल तसेच त्याबाबतची सर्व माहिती मिळण्यासाठी २४ तास मदत उपलब्ध असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
२६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत भारत- आफ्रिका समिट होणार असून त्यात ५४ देश सहभागी होतील. 
दरम्यान दिवाळीनंतर आपण ब्रिटनच्या दौ-यावर जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमध्ये जिथे वास्तव्य होते, ती संपत्ती आता भारताची झाली आहे. ब्रिटनदौ-या दरम्यान त्या आंबेडकर भवनाचे लोकार्पण होणार आहे. ते भवन सर्वांसाठी प्रेरणास्थान असेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. 
 

Web Title: Government job without getting interview from 1st January!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.