CoronaVirus : कोरोनाविरोधात पुढच्या महिन्यापासून सरकारची नवी मोहीम; प्रत्येक जण होणार 'बाहुंबली'!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 11:31 PM2021-10-27T23:31:27+5:302021-10-27T23:32:19+5:30
देशाला 100 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात यश मिळाले आहे. मात्र, लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव, लसींबाबतचा संकोच आणि भौगोलिक मर्यादा यामुळे, देशाच्या काही भागांत लसीकरणाचा वेग मंद आहे.
सरकार पुढील महिन्यापासून कोरोना व्हायरस विरोधात नवीन मोहीम सुरू करणार आहे. 'हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहेत. यादरम्यान, दुसऱ्या डोसपासून वंचित राहिलेल्या लोकांना तसेच ज्यांना आतापर्यंत एकही डोस मिळालेला नाही, अशांनाही लस दिली जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले.
आरोग्यमंत्री म्हणाले, या मोहिमेत देशातील त्या 48 जिल्ह्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले जाईल, ज्या जिल्यांत 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील 50 टक्के लोकसंख्येपेक्षाही कमी लोकांना कोरोना लस दिली गेली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मांडविया यांनी ही घोषणा केली. अलीकडेच, देशाला 100 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात यश मिळाले आहे. मात्र, लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव, लसींबाबतचा संकोच आणि भौगोलिक मर्यादा यामुळे, देशाच्या काही भागांत लसीकरणाचा वेग मंद आहे.
11 कोटी लोकांनी वेळ होऊनही लस घेतली नाही -
कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतलेल्या 11 कोटींहून अधिक लोकांनी दोन डोसमधील निर्धारित अंतर संपल्यानंतरही दुसरा डोस घेतलेला नाही. आकडेवारीचा विचार करता, 3.92 कोटीं पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी 6 आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून दुसरा डोस घेतलेला नाही. त्याच प्रमाणे, सुमारे 1.57 कोटी लोकांनी चार ते सहा आठवड्यांच्या गॅपनंतर त्यांचा Covishield किंवा Covaxin चा दुसरा डोस घेतलेला नाही. तसेच, 15 कोटींहून अधिक लोकांनी दोन ते चार आठवडे उशीरा डोस घेतला आहे. याशिवाय, समीक्षा बैठकीदरम्यान मुलांच्या कोरोना लसीसंदर्भातही चर्चा झाली.