सरकारी कार्यालयांत शुक्रवारी खादीचा पोषाख ?
By admin | Published: March 10, 2016 04:02 AM2016-03-10T04:02:43+5:302016-03-10T04:02:43+5:30
सर्व सरकारी कार्यालयांमध्ये दर शुक्रवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचा पोषाख परिधान करणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरातील लघू विणकरांच्या
नवी दिल्ली : सर्व सरकारी कार्यालयांमध्ये दर शुक्रवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचा पोषाख परिधान करणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरातील लघू विणकरांच्या फायद्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेचा एक भाग म्हणून आठवड्यातून किमान एकदा तरी खादीचे कपडे परिधान करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करावे, अशी विनंती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. आयोगाच्या या विनंतीवर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.
‘देशभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे परिधान करावेत,’ असे आवाहन खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना यांनी केले आहे. तथापि खादीचा पोषाख परिधान करणे ऐच्छिक असेल. खादीची
विक्री वाढविण्यासाठी ही संकल्पना पुढे
आली आहे. प्रत्येकाने खादीचा एक पोषाख
जरी खरेदी केला तरी विक्री किती वाढेल, असा त्याचा उद्देश आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीला प्रोत्साहन देण्याचे प्रतिपादन अनेकदा केले आहे. त्यातूनच ही कल्पना पुढे आली आहे.
देशात केंद्र सरकारचे ३५ लाख कर्मचारी असून, त्यात रेल्वे व संरक्षण खात्याच्या कर्मचाऱ्यांना समावेश नाही. आठवड्यातून एक दिवस खादी परिधान करण्याची कल्पना फार चांगली असल्याचे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. काही अधिकारी सध्या खादीचे कपडे घालतात, असेही हा अधिकारी म्हणाला. मात्र कपड्यांबाबत सरकारने सक्ती करू नये, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पुरुपांचे कपडे वा महिलांच्या साड्या वा पंजाबी सुट विकत घेणे, त्यांना स्टार्च घालणे, इस्त्री करणे खर्चीक असल्याची तक्रार काही कर्मचारी करीत आहेत. मात्र, फॅब इंडिया आणि रेमंड यांसारख्या कंपन्यांशी खादी आणि ग्रामोद्योग आयोग करार करीत आहे. या करारानंतर अशा कंपन्यांच्या शोरूममध्ये खादीचे कपडे विक्रीसाठी उपलब्ध राहतील. (वृत्तसंस्था)