गुगल, अॅपलला टक्कर देण्याची तयारी; मोदी सरकारची नवी योजना; बड्या कंपन्यांना मोठा धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:30 PM2022-01-27T15:30:24+5:302022-01-27T15:32:31+5:30
गुगल, ऍपलच्या वर्चस्वाला धक्का देण्याची मोदी सरकारची तयारी; आणखी एका क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल
जगातील दोन बलाढ्य कंपन्यांना टक्कर देण्याची तयारी मोदी सरकारनं केली आहे. स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टिम आणण्यासाठी धोरण निश्चित करण्याचं सरकारनं ठरवलं आहे. गुगलच्याअँड्रॉईड आणि ऍपलच्या आयओएसला पर्याय म्हणून ऑपरेटिंग सिस्टिम तयार करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे.
सध्याच्या घडीला मोबाईलमध्ये प्रामुख्यानं अँड्रॉईड आणि आयओएस या दोन ऑपरेटिंग सिस्टिम आहेत. या दोन व्यतिरिक्त कोणतीही तिसरी ऑपरेटिंग सिस्टिम उपलब्ध नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारत सरकार नव्या ऑपरेटिंग सिस्टिमच्या निर्मितीत रस घेत आहे. यासाठीच्या धोरणांवर आम्ही काम करत आहोत, असं चंद्रशेखर यांनी सांगितलं.
स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टिम तयार करण्याची क्षमता स्टार्टअप आणि शैक्षणिक एकोसिस्टम दोन्ही क्षेत्रांमध्ये असल्याचं चंद्रशेखर म्हणाले. या कार्यक्रमाला माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवदेखील उपस्थित होते. सध्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमच पाहायला मिळते. अॅपलचे फोन सोडल्यास जवळपास सर्वच स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम आहे. गुगलनं अँड्रॉईडची निर्मिती केली आहे.