दररोज 50 लाख जणांना रोजगार देणार यूपी सरकार; योगींची योजना होतेय तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 07:10 PM2020-05-12T19:10:09+5:302020-05-12T19:10:25+5:30
मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि इतर राज्यातून अद्यापही हजोर मजूर पायीच आपल्या गावाकडं जाताना दिसत आहेत. त्यात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणऱ्या मजुरांची संख्या लक्षणीय आहे
लखनौ - लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी, रेल्वे, बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशल श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. गावी पोहोचल्यानंतर आता करायचे काय, असा प्रश्न वाटेत चालतानाच या मजूरांच्या मनात भेडसावत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मजुरांच्या प्रश्नावर उत्तर शोधले आहे.
मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि इतर राज्यातून अद्यापही हजोर मजूर पायीच आपल्या गावाकडं जाताना दिसत आहेत. त्यात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणऱ्या मजुरांची संख्या लक्षणीय आहे. लाखो मजूर आता आपल्या गावी पोहोचल आहेत, पोहोचत आहेत. तर, आता मुंबईत जायचं नको, असेही अनेकांनी ठरवलंय. मात्र, भविष्याचा मोठा प्रश्न या मुजरांपुढे उभा राहिला आहे. गावी जाऊन करायचं काय, पोट भरायचं कसं, हीच काळजी त्यांना भेडसावत आहे. त्यामुळेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मजुरांच्या रोजगारासाठी एक योजना आखायला सुरुवात केली आहे.
या महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात १ कोटी रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेशच योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. ग्रामीण भागात रोजगारनिर्मित्तीसाठी मनरेगा सर्वात प्रभावी उपक्रम असल्याचं योगींनी म्हटलं आहे. २३ कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आपण ५० लाख रोजगार निर्मित्ती काही वेळेत करणे आवश्यक आहे. सध्या अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणे, हेच सर्वात मोठे कार्य आहे. त्यासाठी, प्रत्येक ग्रामसेवकाने मजबुतीने आणि जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. योगी आदित्यनाथ यांनी सरकारी बंगल्यावर जवळपास ३५ हजार ८१८ ग्रामसेवकांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून २२५.३९ कोटींची रक्कम जमा केले आहेत.
राज्यात एमएसएमईद्वारे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यांसदर्भात योगी आदित्यानाथ यांनी व्हिडिओ कॉन्फेरेन्सिंगद्वारे अनेक उद्योजकांशी संवादही साधला. दरम्यान, मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत. यातून अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत १५ मजूरांचा मृत्यू झाला. या घटनेनं देशातील मजूरांच्या स्थलांतराचे भीषण वास्तव जगासमोर आले आहे.