...तर लोकसभेसोबतच काश्मीरमध्ये निवडणूक घेऊ- राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 07:53 PM2019-01-03T19:53:43+5:302019-01-03T20:00:02+5:30
काँग्रेसच्या प्रश्नाला राजनाथ सिंह यांचं उत्तर
नवी दिल्ली: काँग्रेसची सत्ता असताना काश्मीरमध्ये सुवर्णकाळ होता. तर मग काश्मीरमधील स्थिती आज अशी का?, असा सवाल गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत उपस्थित केला. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काश्मीरमधील स्थितीवर भाष्य करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर राजनाथ सिंह यांनी आझाद यांना प्रत्युत्तर दिलं. निवडणूक आयोगानं सूचना केली, तर लोकसभेसोबतच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होईल, असंही सिंह म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी गुलाम नबी आझाद यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस आणि भाजपा सरकारची तुलना केली. 'काँग्रेसनं जम्मू-काश्मीरचा विकास केला. मग आज तिथली परिस्थिती अशी का?' असा प्रश्न सिंह यांनी विचारला. 'पंतप्रधान मोदींनी गेल्या 4 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरच्या विकासाकडे विशेष लक्ष दिलं. मागील 4 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरला जितका निधी देण्यात आला, तितका याआधी कधीही देण्यात आला नव्हता. आमच्या सत्ताकाळात दहशतवादी घटना कमी झाल्या. राज्यात शांतता नांदावी, यासाठी आम्ही हुर्रियतशी बोलायलादेखील तयार होतो. मात्र त्यांनी बातचीत करण्यास नकार दिला,' असं सिंह यांनी सभागृहाला सांगितलं.
भाजपा सरकार निवडणूक आयोगाला लोकसभेसोबतच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घ्यायला सांगणार का, असा प्रश्न राजनाथ सिंह यांना गुलाम नबी आझाद यांनी विचारला. त्यावर निवडणूक आयोगानं सूचना दिल्यास सरकारला दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यात काहीही अडचण येणार नाही, असं उत्तर सिंह यांनी दिलं. गेल्या वर्षी जून महिन्यात भाजपानं जम्मू-काश्मीरमधील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. यानंतर नोव्हेंबरमध्ये पीडीपीनं काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीनं सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली होती. मात्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्याआधीच विधानसभा विसर्जित केली.