क्रीम लावून गोरं होण्यासाठी आता लागणार डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 04:46 PM2018-04-11T16:46:23+5:302018-04-11T16:46:23+5:30
क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन लागणार आहे.
नवी दिल्ली- क्रीम लावून गोरं होण्याच्या जाहिराती आपण सर्सास पाहतो. जाहिराती पाहून क्रीम विकत घेणारीही लोकही आहेत. एखादी क्रीम वापरून पकटन गोरं होण्याकडे लोकांचाही कल असतो. पण आता याच फेअरनेस क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन लागणार आहे. सरकारने फेअरनेस क्रीम्ससाठी नवे नियम लागू केले आहेत. आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय फेअरनेस क्रीम्स विकत घेता येणार नाहीत. कारण अनेक फेअरनेस क्रीम्समध्ये स्टेरॉईड आणि अँटीबायोटीकचा समावेश असल्याचं समोर आलं होतं.
नुकतंच सरकारने स्टेरॉईड असणाऱ्या क्रीम्सना 'ओव्हर द काऊंटर'च्या विक्री यादीतून काढून शेड्युल-एचमध्ये टाकलं आहे. याअंतर्गत अशाप्रकारच्या फेअरनेस क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आवश्यक आहे. स्टेरॉइड मिश्रित क्रीम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून एफडीएकडून कारवाई होईल.
नव्या नियमानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्टेरॉईड आणि अँटीबायोटीकचा समावेश असलेल्या १४ क्रीम्सच्या विक्रीवर बंदी आणली आहे. या नियमांचं पालन केलं नाही तर एफडीएच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. 23 मार्च रोजी याबाबतची सूचना देण्यात आली होती.