अचानक कुठे गेल्या ATM मधल्या नोटा?; अर्थमंत्री जेटलींनी सांगितलं कशा फुटल्या वाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 01:10 PM2018-04-17T13:10:28+5:302018-04-17T13:10:28+5:30
नोटांच्या तुटवड्यावर जेटलींचं स्पष्टीकरण
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर एटीएममध्ये जसा खडखडाट झाला होता, तसंच चित्र देशाच्या अनेक भागांत दिसू लागल्यानं आश्चर्य आणि चिंता व्यक्त होतेय. एटीएममधल्या नोटा गेल्या कुठे?, असा प्रश्न विचारला जातोय. परंतु, या चलनचणचणीमागे कुठलाही गडबड-घोटाळा नसल्याचा खुलासा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या रोख रकमेचा तुटवडा जाणवतो आहे. यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. 'देशातील काही भागांमध्ये रोख रकमेची मागणी जास्त असल्यानं इतर भागांमध्ये चणचण जाणवी लागली आहे. देशातील बाजारात सध्या गरजेपेक्षा जास्त रक्कम उपलब्ध आहे,' असं जेटलींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
Have reviewed the currency situation in the country. Over all there is more than adequate currency in circulation and also available with the Banks. The temporary shortage caused by ‘sudden and unusual increase’ in some areas is being tackled quickly.
— Arun Jaitley (@arunjaitley) April 17, 2018
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री प्रसाद शुक्ल यांनी नोटांचा तुटवडा तीन दिवसांमध्ये संपुष्टात येईल, अशी माहिती दिली. 'काही भागांमध्ये नोटांची चणचण जाणवत आहे. नोटांचा तुटवडा असलेल्या भागांमध्ये लवकरच चलन पुरवठा केला जाईल,' असं शुक्ल यांनी सांगितलं. 'सध्याच्या घडीला आमच्याकडे 1 लाख 25 हजार कोटी रुपयांची रोकड आहे. काही राज्यांमध्ये जास्त रोकड असल्यानं समतोल बिघडला आहे. त्यामुळेच सरकारनं राज्य स्तरावर एक समिती स्थापना केली आहे,' अशी माहितीही त्यांनी दिली. नोटांची कमतरता असलेल्या भागांमध्ये तीन दिवसांमध्ये नोटांचा पुरवठा केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात गेल्या आठवड्यापासून रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रोकड नेमकी गेली कुठे?, असा प्रश्न लोकांना पडला आहे. दोन हजारांच्या नोटादेखील बाजारातून अचानक गायब झाल्यानं पुन्हा एकदा साठेबाजी सुरू झाली का, असा संशयदेखील व्यक्त होत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीदेखील याबद्दल शंका उपस्थित करत यामागे कटकारस्थान असल्याची शक्यता वर्तवली आहेत.