सरकार म्हणते, लसीमुळे कोणाचाही मृत्यू नाही, ३.८१ लाखांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 02:29 AM2021-01-19T02:29:01+5:302021-01-19T06:58:30+5:30
नितीन अग्रवाल - नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेत तीन दिवसांत देशात ३.८१ लाखांपेक्षा जास्त लोकांना लस दिली गेली ...
नितीन अग्रवाल -
नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेत तीन दिवसांत देशात ३.८१ लाखांपेक्षा जास्त लोकांना लस दिली गेली आहे. या लसीच्या दुष्परिणामांवरून शंका मात्र थांबायला तयार नाहीत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी या शंका स्पष्ट फेटाळल्या. लसीकरणामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या निखालस खोट्या असल्याचे सरकारने सांगितले.
गुलेरिया म्हणाले की, लसीचे किरकोळ दुष्परिणाम होऊ शकतील, पण त्यामुळे घाबरायचे कारण नाही. कोणत्याही ओषधाची काही ॲलर्जिक रिएक्शन होऊ शकते. लसीमुळे शरीरात हलकी वेदना, लस टोचली तेथे थोडीशी सूज, हलका ताप येऊ शकतो.
लसीकरणाच्या सोमवारी तिसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३.८१ लाखांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली गेली. सोमवार एकूण १,४८,२६६ लोकांना लस दिली गेली. सर्वात जास्त ३६,८८८ लोकांना कर्नाटकात आणि २२,५७९ जणांना ओदिशात लस दिली गेली. दिल्लीत लस घेणाऱ्यांची संख्या ३,१११ होती.
मुरादाबादमध्ये लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्याच्या शवविच्छेदन अहवालानंतर रुग्णालय प्रशासनाने हा मृत्यू लसीच्या दुष्परिणामामुळे नाही तर हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटले. मंत्रालयाने कर्नाटकातील बेल्लारीत एकाचा झालेला मृत्यू लसीच्या दुष्परिणामामुळे झाल्याचा इन्कार केला.
५८० जणांना तक्रारी
तीन दिवसांत लसीकरण झालेल्यांतील एकूण ५८० जणांना गंभीर त्रास झाला; परंतु बहुसंख्य जणांना काही तासांनंतर जाण्याची परवानगी दिली गेली. एकूण सात जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यात दिल्ली, उत्तराखंड आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एकेक आणि कर्नाटकमध्ये दोन जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले गेले.