सरकारी नोकरभरती आॅनलाईन पद्धतीने
By admin | Published: May 1, 2016 01:50 AM2016-05-01T01:50:32+5:302016-05-01T01:50:32+5:30
सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया योजनेवर आधारित
नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया योजनेवर आधारित या योजनेच्या अंमलबजावणीनंतर अर्जदारांना सरकारी कार्यालयांच्या खेट्या घालणे आणि तातडीने व्हेरीफिकेशनसाठी लाच देण्याची गरज पडणार नाही.
उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्यापासून तर नियुक्तीपर्यंत कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांला सामोरे जावे लागणार नाही, हे विशेष! सचिवांच्या एका गटाने जानेवारी महिन्यात भरती प्रक्रिया आॅनलाईन करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार सरकारने हे पाऊल उचलले आहे. १२ सचिवांच्या या गटात कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे सचिव संजय कोठारी आणि विदेश सचिव एस. जयशंकर यांचा समावेश होता.
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, कार्मिक मंत्रालयाचे सचिव या योजनेच्या तातडीने अंमलबजावणीसाठी सचिव गटाच्या शिफारशींचा दर आठवड्याला आढावा घेत आहेत. केंद्रातील सर्व सचिव आणि राज्यांच्या मुख्य सचिवांसमक्ष ही योजना मांडण्यात आली आहे.
याशिवाय अर्जदारांना प्रमाणपत्रांच्या मूळ अथवा छायांकित प्रती देण्याचीही गरज पडणार नाही. ते आपले प्रमाणपत्र डिजिटल लॉकरमध्ये अपडेट करू शकतील. तेथून सरकारला गरज पडल्यास हे दस्तावेज आॅनलाईन मिळू शकतील. डिजिटल लॉकरमध्ये अपलोड केलेले प्रमाणपत्रच पुरेसे असतील आणि संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन असेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)