सरकारने पूर्वीच प्रतिक्रिया द्यायला हवी होती
By admin | Published: June 30, 2016 03:49 AM2016-06-30T03:49:51+5:302016-06-30T03:49:51+5:30
आपल्या मुलावर राजकीय हल्ले सुरू झाल्याबरोबर सरकारने प्रतिक्रिया दिली असती, तर गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ न स्वीकारण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला नसता
चेन्नई : आपल्या मुलावर राजकीय हल्ले सुरू झाल्याबरोबर सरकारने प्रतिक्रिया दिली असती, तर गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ न स्वीकारण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला नसता, असे रघुराम राजन यांचे वडील आणि माजी वरिष्ठ सनदी अधिकारी आर. गोविंद राजन यांनी म्हटले आहे.
गोविंद राजन आणि त्यांची पत्नी मिथिली यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मुलावर झालेल्या राजकीय हल्ल्यांबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले. गोविंद राजन हे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते म्हणाले की, सरकारने राजन यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली असती, तर कदाचित ४ सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँक सोडण्याच्या निर्णय त्यांनी घेतला नसता. सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी राजन यांच्याबाबत मौन तोडताना त्यांचा बचाव केला होता व राजन हे देशभक्तच असल्याचे व त्यांच्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या बाबी चुकीच्या असल्याचे म्हटले होते. (वृत्तसंस्था)
जगणे सोपे राहिले नाही.... राजन यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले हे संपूर्ण जग पाहत आहे. त्यांना निष्कारण वादात ओढण्यात आले. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उभे केले जाऊ शकतात; पण त्यांच्या देशभक्तीबद्दल सवाल उपस्थित केला जाऊ शकत नाही. आमच्यासाठी जगणे सोपे राहिले नाही, असेही मिथिली म्हणाल्या.