चित्रपटसृष्टीसाठीही सरकार ठरावे ‘हीरो’ !
By admin | Published: May 14, 2015 01:59 AM2015-05-14T01:59:18+5:302015-05-14T01:59:18+5:30
एक सामान्य नागरिक म्हणून वर्षपूर्तीबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन. मागच्या वर्षी केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ झाले तेव्हा परिवर्तनाची नांदी घुमत होती
एक सामान्य नागरिक म्हणून वर्षपूर्तीबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन. मागच्या वर्षी केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ झाले तेव्हा परिवर्तनाची नांदी घुमत होती. काँग्रेसशिवाय दुसरा कोणताही पक्ष देशाचा कारभार सांभाळू शकत नाही, असा समज होता. ६७ वर्षांपासून अशा राजकीय परिवर्तनाची प्रतीक्षा होती. सब का साथ, सब का विकास’ या वायद्यावर जनतेचा विश्वास संपादन करीत पहिल्यांदाच स्पष्ट बहुमतासह भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले.
पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या विकासाला गती देत जगभरात देशाची प्रतिमा उंचावण्याकामी आणि भूमिका वजनदार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले टाकली. हे उपाय किती प्रभावी ठरले, याचा लेखाजोखा घेण्यासाठी वर्षभराचा अवधी माझ्या दृष्टीने पुरेसा नाही.
मोदी सरकारने विकासाचे जे बीजारोपण केले, त्याची फळे हाती पडण्यास थोडा नव्हे तर बराच अवधी लागेल. पाच वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक अवधी लागू शकतो. तथापि, एवढे मात्र नक्की की देश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत, यासाठी पंतप्रधान मोदी निश्चितच अभिनंदनाचे हकदार आहेत.
मोदी सरकारच्या वाटचालीसोबत देशाचा विकासही गतिमान होईल, असा माझा ठाम विश्वास आहे.
स्वच्छता अभियान आणि सब का साथ, सब का विकास या दोन योजनांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. स्वच्छता अभियानात सर्वसामान्य जनतेलाही सहभागी करून घेण्यात आले, हे विशेष. या अभियानामुळे रस्ते चकाचक झाले. सब का साथ, सब का विकास या निर्धाराप्रती बांधिलकी जपत मोदी सरकारने त्यादृष्टीने पावलेही टाकली. सर्वसामान्य जनतेसाठी लाभदायी योजना सुरू केल्या. हे सर्व निर्णय म्हणजे योग्य दिशेने टाकलेले पाऊल असून, विकासाच्या दृष्टीने मी हे शुभ संकेत मानतो.
फिल्म इंडस्ट्रीशी असलेल्या नात्याने विचार केल्यास असे प्रकर्षाने जाणवते, की मोदी सरकारने फिल्म इंडस्ट्रीत कोणत्याही प्रकारे ढवळाढवळ केली नाही, ही बाब बॉलीवूडच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र सेन्सॉर बोर्डात मोठे फेरबदल करण्यात आले. इतर अनेक मुद्द्यांवरून वादाला तोंड फुटले. मीही सध्या या बोर्डाचा सदस्य आहे. माझ्यासकट अन्य सदस्यही या बोर्डाच्या कारभाराबाबत समाधानी नाहीत, हे सांगण्यात मला कोणताही संकोच वाटत नाही.
आम्ही सर्व जण बोर्डाची कार्यशैैली सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत आहोत. मतभेद आणि विरोध असतानाही अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या. सेन्सॉर बोर्डासाठी आॅनलाइन सिस्टीम सुरू करण्यात आली. इतर काही समस्या आहेत, त्याही नजीकच्या काळात सोडविल्या जातील.
आणखी एक मुद्दा म्हणजे बॉलीवूडमधील अनेक कलाकार संसदेत असूनही बॉलीवूडचा आवाज मात्र तेथे उमटतच नाही. अलीकडेच संसद सदस्यांच्या बैठकीत बॉलीवूडशी संबंधित, फिल्म इंडस्ट्रीजशी संबंधित प्रश्न कशा पद्धतीने मांडायला हवेत, यावर सांगोपांग चर्चाही झाली.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादाचा. राष्ट्रवादाला प्राधान्य देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती कधी होईल, याची वाट पाहात आहोत. दक्षिण भारतात या दिशेने एक नवीन सुरुवात झाली आहे. तेथील लोकांशी यासंदर्भात सल्लामसलत केली जात आहे. हिंदी चित्रपटाच्या संदर्भातही राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर विचार व्हायला हवा. त्यामुळे चित्रपटाचा आत्मा आणि दिशा या दोन्हीत व्यापक बदल घडून येईल.
सेन्सॉर बोर्ड असो की फिल्म इंडस्ट्रीजशी संबंधित इतर मुद्द्यांवर चित्रपटसृष्टीने एकजुटीने हक्कासाठी आवाज उठवायला हवा. तसेच अशा एकीतूनच सरकारी यंत्रणा आणि न्यायालयीन संघर्ष यशस्वी करता येईल.