सरकारने शाळा सुरू करण्याबाबत वेगाने काम करायला हवे - डाॅ. गुलेरिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 06:01 AM2021-06-28T06:01:47+5:302021-06-28T06:02:39+5:30
‘एम्स’चे संचालक डाॅ. गुलेरिया यांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा अद्यापही बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्ग उपलब्ध हाेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आक्रमकपणे काम करायला हवे, असे मत ‘एम्स’चे संचालक डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले.
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. मधल्या काळात काही कालावधीसाठी शाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्या पुन्हा बंद झाल्या. बहुतांश वर्ग ऑनलाइन माध्यमातूनच सुरू आहेत. मात्र, शाळा सुरू करण्याबाबत काम केले पाहिजे, असे डाॅ. गुलेरिया म्हणाले. त्यांनी सांगितले, की शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर परिणाम झाला आहे. दुर्बल घटकातील मुलांना ऑनलाइन वर्गाचा लाभ मिळत नाही. या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान हाेत आहे.
काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज
शाळा सुरू करण्याचा निर्णय काळजीपूर्वक घेतला पाहिजे, असे मत नीती आयाेगाचे सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी व्यक्त केले. हा निर्णय कठीण आहे. शाळांमध्ये मुले एकत्र येतात आणि त्यांना संसर्ग हाेण्याचा धाेका असल्याचे ते म्हणाले.