होशियार... तुम्ही टीव्हीवर काय बघता यावरही आता सरकारचं लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 10:52 AM2018-04-16T10:52:14+5:302018-04-16T10:52:14+5:30
सेट टॉप बॉक्समध्ये चीप लावण्यासाठी प्रस्ताव
नवी दिल्ली: माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं टीव्हीच्या सेट टॉप बॉक्समध्ये एक चीप लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रेक्षक किती वेळ कोणतं चॅनल पाहतात, याची माहिती चीपमधून मिळू शकणार आहे. चॅनल पाहणाऱ्या लोकांची नेमकी आकडेवारी गोळा करण्यासाठी सेट टॉप बॉक्समध्ये चीप बसवण्यात येणार आहे. यामुळे जाहिरातदारांना मदत होईल, असं सरकारला वाटतं.
'डीटीएच ऑपरेटर्सना नव्या सेट टॉप बॉक्समध्ये चीप लावण्यास सांगितले जाईल. या चीपमध्ये प्रेक्षक कोणतं चॅनल पाहतात आणि ते नेमकं कोणत्या वेळेत पाहतात, याची माहिती गोळा होईल,' असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं त्यांच्या प्रस्तावात म्हटलं आहे. डीटीएच परवान्यांशी संबंधित अनेक मुद्यांवर ट्रायनं शिफारशी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं चीपबद्दलचा प्रस्ताव दिला.
दूरदर्शनची प्रेक्षक संख्या नेहमी कमी दाखवली जाते, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला वाटतं. खुद्द याच मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं हा आक्षेप बोलावून दाखवला. सेट टॉप बॉक्समध्ये चिप लावल्यावर प्रेक्षकांचा खराखुरा आकडा मिळू शकेल, असा विश्वास या अधिकाऱ्यानं व्यक्त केला. यामुळे देशातील ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंसिल इंडियाची (बार्क) मक्तेदारी संपुष्टात येईल. 'सध्या देशात बार्कला कोणताही पर्याय नाही. बार्क कुठून आकडेवारी गोळा करतं, त्यासाठीची प्रक्रिया काय आहे, कोणत्या भागातून आकडेवारी जमा केली जाते, याबद्दलची कोणतीही माहिती सांगितली जात नाही', असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.