नोटबंदीसारख्या रांगा देशात पुन्हा लागाव्यात हीच सरकारची इच्छा- प्रियंका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 11:19 PM2019-12-20T23:19:29+5:302019-12-20T23:26:40+5:30
गरीब, मोलमजुरी करणारे 30-35 वर्षे जुनी कागदपत्रं कुठून आणणार; प्रियंका गांधींचा सवाल
नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण पेटलं आहे. अनेक राज्यांमध्ये आंदोलनांना हिंसक वळण लागल्यानंतर राजकीय पक्षदेखील सक्रीय झाले आहेत. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी नव्या कायद्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधींनी इंडिया गेट परिसरात दाखल होत आंदोलनात सहभागी नोंदवत मोदी सरकारवर तोफ डागली.
सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी गरिबांच्या विरोधात आहे. देशातील गरीब जनतेला नव्या कायद्यांचा सर्वाधिक फटका बसणार आहे. अशा परिस्थितीत मोलमजुरांनी काय करायचं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनता ३०-३५ वर्ष जुनी कागदपत्रं कशी दाखवणार? मोदी सरकार देशाला कोणती परिस्थिती निर्माण करू पाहात आहे?, असे प्रश्न त्यांनी विचारले. नोटबंदीवेळी देशातील जनता रांगेत उभी राहिली होती. आताही त्याचप्रकारे देश रांगेत उभा राहावा, असं सरकारला वाटतं, अशा शब्दांत प्रियंका गांधींनी केंद्राला लक्ष्य केलं.
Congress leader Priyanka Gandhi Vadra at a protest, at India Gate, Delhi: #CitizenshipAct & NRC are against the poor. The poor they will be most affected by it. What will the daily wage labourers do?; Demonstrations should be held peacefully. pic.twitter.com/icuqghggTc
— ANI (@ANI) December 20, 2019
नव्या कायद्यांचा फटका केवळ गरिबांना बसेल, असं प्रियंका म्हणाल्या. श्रीमंत माणसं त्यांच्याकडे असणारा पासपोर्ट दाखवतील. मात्र गरीब, मोलमजुरी करुन जगणारे काय करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नव्या कायद्याविरोधातलं आंदोलन शांततेच्या मार्गानंच सुरू ठेवा, असं आवाहनदेखील यावेळी त्यांनी आंदोलकांना केलं. प्रियंका यांच्या आधी सोनिया गांधींनीदेखील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. जनतेला सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र सरकार त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा आवाज क्रूरपणे दाबत आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी आपल्या व्हिडीओ संदेशातून केला.
भाजपाचं सरकार देशभरातील विद्यार्थी आणि जनतेकडून करण्यात येत असलेलं आंदोलन ज्या प्रकारे दाबत आहे, ते पाहून काँग्रेस पक्ष चिंतीत झाला आहे. देशभरातील विद्यापीठं, आयआयटी, आयआयएम आणि अन्य आघाडीच्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी भाजपा सरकारच्या फुटिरतावादी आणि लोकविरोधी धोरणांविरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलनं करत आहेत. लोकशाहीमध्ये चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवण्याचा आणि चिंता व्यक्त करण्याचा नागरिकांना हक्क आहे. लोकांचं म्हणणे ऐकून घेत त्यांच्या मनातील शंकांचं निरसन करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं सोनिया गांधी भाजपा सरकारवर बरसल्या.