अपघातग्रस्ताची मदत करणा-यास दिल्ली सरकारकडून दोन हजार रूपयांचं बक्षिस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 06:29 AM2017-11-16T06:29:39+5:302017-11-16T06:43:28+5:30
'चांगलं काम' करणा-या व्यक्तींसाठी नवी योजना, या योजनेनुसार 'चांगलं काम' करणा-यास दोन हजार रूपयांचं बक्षिस
नवी दिल्ली - अपघातग्रस्तांची मदत करणा-या व्यक्तींसाठी दिल्ली सरकार लवकरच एक नवी योजना सुरू करणार आहे. या योजनेनुसार मदत करणा-या व्यक्तीस दोन हजार रूपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे. या योजनेला दिल्ली सरकारने जानेवारी महिन्यात मंजुरी दिली होती. लवकरच ही योजना अंमलात येणार आहे. इतरांची मदत करण्यास, चांगलं काम करण्यास लोकांना प्रोत्साहन मिळावं हा या योजनेमागचा उद्देश असल्याचं दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं. बिजनेस स्टॅन्डर्डने याबाबत वृत्त दिलं आहे.
काय असेल चांगलं काम -
रस्त्याने कुठे जाताना तुम्हाला कोणाचा अपघात झाल्याचं दिसल्यास त्या जखमीला शक्य तेवढ्या लवकर जवळच्या सरकारी अथवा खासगी कोणत्याही रूग्णालयात भरती करावं. जखमीची योग्य वेळेस मदत करून त्याला रूग्णालयात पोहोचवणा-यास दोन हजार रूपयांचं बक्षिस देण्यात येईल, असं जैन म्हणाले. जखमीच्या उपचाराचा खर्चही दिल्ली सरकारच करेल असंही जैन यांनी सांगितलं.
ही योजना कशासाठी -
गेल्या वर्षी दिल्लीच्या सुभाष नगरमध्ये अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा कोणीही मदत न केल्याने उपचाराअभावी दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अशाप्रकारची योजना सुरू करण्याचा विचार दिल्लीच्या केजरीवाल सरकारने केला होता. इतरांना मदत करणा-यांना या योजनेमुळे प्रोत्साहन मिळेल असा विश्वास जैन यांनी यावेळी व्यक्त केला.