परदेशांतील भारतीय लोकप्रतिनिधींना बनविणार सदिच्छादूत, सरकारची योजना; ९ जानेवारीला संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:19 AM2018-01-06T01:19:39+5:302018-01-06T01:20:01+5:30
भारतीय परराष्ट्र धोरणाची मुद्रा जगात प्रभावीपणे उमटावी यासाठी मोदी सरकार आगळीवेगळी योजना राबविण्याच्या विचारात आहे. अन्य देशांतील भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींना भारताचे अघोषित राजदूत म्हणजे सदिच्छादूत बनविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली - भारतीय परराष्ट्र धोरणाची मुद्रा जगात प्रभावीपणे उमटावी यासाठी मोदी सरकार आगळीवेगळी योजना राबविण्याच्या विचारात आहे. अन्य देशांतील भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींना भारताचे अघोषित राजदूत म्हणजे सदिच्छादूत बनविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
मूळ भारतीय वंशाचे वा पूर्वी भारतीय नागरिक असलेल्यांपैकी जे आता विविध देशांत लोकप्रतिनिधी आहेत, त्यापैकी निवडक लोकप्रतिनिधींचे एक संमेलन दिल्लीमध्ये ९ जानेवारी रोजी मोदी सरकारने आयोजित केले आहे. या संमेलनात २२ देशांतील १२४ लोकप्रतिनिधी तसेच १५ महापौर सहभागी होणार आहेत. अमेरिकेतील दोन महापौरही याप्रसंगी उपस्थित राहाणार आहेत. मात्र अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींनी या संमेलनात सहभागी होण्याबाबत आपला होकार अद्याप कळविलेला नाही. अमेरिकन सिनेटमध्ये सुरु असलेल्या कामकाजामुळे त्यांना संमेलनाला येणे शक्य होणार नाही असे सांगितले जात आहे. या लोकप्रतिनिधींद्वारे भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत त्या त्या देशांमध्ये सकारात्मक वातावरण तयार करणे शक्य होईल, असे मोदी सरकारला वाटत आहे. देशोदेशांतील भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी आपल्या मातृभूमीविषयी मनात ममत्व बाळगून असतात. नेमका याच गोष्टीचा उपयोग मोदी सरकारला करुन घ्यायचा आहे.
पाकचा कोणीच नाही
इंग्लंडमधून १५, न्यूझीलंडमधून ३, कॅनडातून ५ लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. गियानातून २०, स्वित्झर्लंडमधून १, मॉरिशसमधून ११, सूरिनाममधून ९ लोकप्रतिनिधी संमेलनाला येत आहेत. केनिया, फिलापाइन्स, पोर्तुगाल, टांझानिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांतूनही भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी संमेलनास उपस्थित असतील. सार्क देशांमधून फक्त श्रीलंकेतून मूळ भारतीय वंशाचे चार लोकप्रतिनिधी येणार आहेत. पाकिस्तान व बांगलादेशातून मात्र या संमेलनास कोणीही उपस्थित राहाणार नाही.