रोजगाराचे वास्तव चित्र मांडणार सरकार, जनतेसमोर वस्तुस्तिथी ठेवणार; तयार करणार योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 04:41 AM2020-10-24T04:41:29+5:302020-10-24T07:06:55+5:30
श्रम मंत्रालयाच्या सूत्रांनुसार मंत्रालयाची सांख्यिकी शाखा यासाठी पाहणी करील. या पाहणीत बाजारात रोजगाराचे वास्तव चित्र समजून घेता येईल व देशासमोर खरेखुरे चित्र मांडता येईल. यामुळे रोजगाराची संधी निर्माण करणे सोपे जाईल व अशा योजना योग्यरीत्या लागू केल्या जातील.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : मोदी सरकार आव्हान बनलेल्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे प्रत्यक्षातील चित्र जनतेसमोर ठेवणार आहे. यासाठी सरकार प्रत्येक प्रकारच्या रोजगाराशी संबंधित संख्या जनतेसमोर ठेवेल. या आकड्यांच्या माध्यमातून सरकार श्रमांना भांडवलासारखे उत्पादनातील महत्त्वाचा घटक म्हणून मांडेल.
श्रम मंत्रालयाच्या सूत्रांनुसार मंत्रालयाची सांख्यिकी शाखा यासाठी पाहणी करील. या पाहणीत बाजारात रोजगाराचे वास्तव चित्र समजून घेता येईल व देशासमोर खरेखुरे चित्र मांडता येईल. यामुळे रोजगाराची संधी निर्माण करणे सोपे जाईल व अशा योजना योग्यरीत्या लागू केल्या जातील.
मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असे की, केंद्र व राज्य सरकारशिवाय मोठ्या संख्येने डॉक्टर, वकील, सीए, आर्किटेक्ट आदी व्यावसायिक रोजगारनिमिर्तीत महत्त्वाची भूमिका बजावतात; परंतु त्यांची आकडेवारी समोर येत नाही. रोजगाराचे वास्तव चित्र मांडताना या आकडेवारीचा विस्ताराने उपयोग केला जाईल.
सरकारचे म्हणणे आहे की, जनतेसमोर रोजगाराचे वास्तविक चित्र येत नाही व त्यामुळे अनेक वेळा विरोधी पक्ष त्यांच्या लाभासाठी भ्रामक स्थिती निर्माण करतात.
रोजगार संधी वाढवण्याचा प्रयत्न
- मंत्रालयाच्या सूत्रांनुसार कोलकाता विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्रोफेसर एस.पी. मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली ही आकडेवारी गोळा करण्यासाठी समिती स्थापन केली गेली आहे. समिती बाजारात रोजगाराच्या अवस्थेची आकडेवारी गोळा करण्यासाठी नमुने गोळा करून योजना बनवील व आकड्यांच्या विश्लेषणाला तपासून अंतिम रूप देईल.
- मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, कोरोना लॉकडाऊनमध्ये बेरोजगारी वेगाने वाढली; परंतु अनलॉकनंंतर सुधारण्याचा वेग बराच कमी आहे. सरकार उद्योगजगताला दिलासा देण्यासाठी दोन पॅकेजच्या माध्यमातून रोजगार संधी वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. पॅकेजची घाेषणा लवकरच केली जाईल, अशी आशा आहे.