आता ड्रायव्हिंग लायसन्सला लागणार आधारचा 'आधार'; लिकिंग अनिवार्य करणार सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 08:59 PM2019-01-06T20:59:07+5:302019-01-06T21:01:02+5:30
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांची माहिती
नवी दिल्ली: पॅन कार्डसह अनेक सरकारी योजनांसाठी मोदी सरकारनं आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. यानंतर आता लवकरच ड्रायव्हिंग लायसन्सदेखील आधार कार्डशी जोडावं लागणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डला लिंक करणं लवकरच सरकारकडून अनिवार्य केलं जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. याआधी आधारच्या अनिवार्यतेवरुन मोठा वाद झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातदेखील गेलं होतं. त्यावर न्यायालयानं आधारच्या अनिवार्यतेला काही प्रमाणात लगाम घातला.
ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड लिंक करणं येत्या काही दिवसांमध्ये अनिवार्य होणार असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली. ते इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये बोलत होते. 'आम्ही लवकरच एक नवा कायदा आणणार आहोत. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डला जोडावं लागेल. अनेकदा अपघाताला जबाबदार असणारी व्यक्ती घटनास्थळावरुन पळ काढते आणि त्यानंतर नवं ड्रायव्हिंग लायसन्स तयार करुन घेते. अशा अनेक घटना देशात घडल्या आहेत. मात्र आधार कार्डमुळे याला आळा बसेल. एखादी व्यक्ती स्वत:चं नाव बदलू शकते. मात्र ती स्वत:चे बायोमेट्रिक्स बदलू शकत नाही. भुबूळ आणि हाताचे ठसे बदलले जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केल्यावर त्या व्यक्तीच्या नावावर आधीच एक लायसन्स असल्याची माहिती सिस्टमकडून मिळेल,' असं प्रसाद यांनी सांगितलं.