राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारच्या ५ वर्षांची विकास गाथा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 06:15 AM2019-02-01T06:15:42+5:302019-02-01T06:16:04+5:30
सर्वच योजनांचा उल्लेख; जगात प्रतिष्ठा वाढल्याचा दावा
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलचे वातावरण आशा-आकांक्षा व उत्कंठेने भारले होते. लोकसभा निवडणुकीआधी, मोदी सरकार देशाला नेमके काय सांगू इच्छिते? याविषयी संसद सदस्यांच्या चेहऱ्यांवर उत्सुकता होती. अशा भारलेल्या वातावरणात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाला. या अभिभाषणाचा मथितार्थ सांगायचा झाला, तर मोदी सरकारच्या ५ वर्षांच्या कारकीर्दीची विकास यात्रा असा करता येईल. सरकारच्या विविध क्षेत्रांतील ५० यशस्वी योजनांचा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रपतींनी अभिभाषणात केला.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले की ‘गेल्या ४ वर्षांत जगभर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. जगात ६ व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे शिखर भारताने गाठले आहे. देशात २०१४ पूर्वी निराशेचे वातावरण होते. त्यानंतर जनतेच्या वेदनांची जाणीव असणारे सरकार सत्तेवर आल्यामुळे भारतात नव्या आशांचा संचार झाला आहे. उज्ज्वला योजनेपासून जनधन योजनेपर्यंत, सर्जिकल स्ट्राईकपासून स्वच्छ भारत अभियानाच्या शौचालय निर्मितीपर्यंत, अनेक यशस्वी योजनांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आयुष्मान जनारोग्य योजनेला अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद, काश्मीर ते गुजरातपर्यंत नव्या एम्सची निर्मिती, पंतप्रधान विमा योजना, ग्रामीण गृहबांधणी (आवास) योजनेत १ कोटी ३० लाख नव्या घरांची निर्मिती, १८ हजार नव्या गावांना वीजपुरवठा, मानवरहित रेल्वे क्रॉसिंग्ज,४ कोटींहून अधिक स्टार्टअपस् ६०० जिल्ह्यांत नवी औषध केंद्रे, १ रुपया प्रीमियमद्वारे २१ कोटी लोकांना आयुर्विमा योजनेचा लाभ, अशी विविध वैशिष्ट्येही राष्ट्रपतींनी नमूद केली.
वन रँक वन पेन्शनद्वारे माजी सैनिकांना १० हजार ७०० कोटी रुपयांच्या पेन्शनची थकबाकीही देणे, जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी ८० हजार कोटींचे पॅकेज, पूर्व भारतात १९ नवी विमानतळे, अशी पायाभूत सुविधांची कामे मोदी सरकारने सुरू वा पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले.
सर्व लक्ष अर्थसंकल्पाकडे
राष्टÑपतींनी सरकारच्या ५ वर्षांच्या विकास यात्रेची लांबलचक जंत्रीच सभागृहासमोर सादर केली. त्यात करतारपूर कॉरिडॉर, नमामी गंगे मिशन, उडान योजना, कोलकाता ते वाराणसी जलवाहतूक, सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस, मोबाईल फोन निर्मितीत भारत जगात दुसºया क्रमांकावर, १६ हजार ग्रामपंचायतींना आॅप्टिकल फायबरने जोडणे, ४० हजार ग्रामपंचायतींना वाय फाय हॉट स्पॉट सुविधा, इंटरनेटचा १ जीबी डेटा १० ते १२ रुपयांपर्यंत स्वस्त, मुद्रा योजनेद्वारे १७ कोटी तरुण-तरुणींना स्वयंरोजगारासाठी कर्जवाटप, प्रसूती रजेचा कालखंड २६ सप्ताहांपर्यंत अशा भल्या मोठ्या यादीचा समावेश होता.