सरकारचा माफी‘योग’
By admin | Published: June 22, 2015 11:54 PM2015-06-22T23:54:57+5:302015-06-22T23:54:57+5:30
योग दिनाच्या कार्यक्रमाचे राजशिष्टाचारानुसार निमंत्रण नसल्यामुळे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी अनुपस्थित राहिले; मात्र त्यामागच्या कारणांची शहानिशा
नवी दिल्ली : योग दिनाच्या कार्यक्रमाचे राजशिष्टाचारानुसार निमंत्रण नसल्यामुळे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी अनुपस्थित राहिले; मात्र त्यामागच्या कारणांची शहानिशा न करताच भाजपचे टिष्ट्वटबहाद्दर सरचिटणीस राम माधव यांनी केलेले विधान अंगलट येऊ लागताच सरकारने सपशेल माफीनामा जाहीर केला आहे. राम माधव यांच्या टिष्ट्वटरवरील शेरेबाजीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच सरकारच्या माफीनाम्यावर समाधान न मानताच काँग्रेसने भाजप व सरकारवर विघटनवादी राजकारणाचा आरोप केला आहे.
राम माधव यांनी खरी परिस्थिती समोर आल्यानंतर वादग्रस्त टिष्ट्वट मागे घेत माफी मागितली. सरकारनेही सारवासारव करीत चुकीची कबुली दिली असली तरी काँग्रेसने सरकारला चांगलेच धारेवर धरत हा वाद पुरता संपला नसल्याचे संकेत दिले आहेत.
राजशिष्टाचारामुळे अन्सारी यांना योग कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, असा खुलासा लगेचच सरकारने केला. पंतप्रधान एखाद्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असतील तर राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींना निमंत्रित केले जाऊ शकत नाही, कारण प्राधान्यक्रमानुसार दोघांचेही वरचे स्थान आहे, असे आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले. अनभिज्ञतेतून ते घडले. आम्ही त्यासाठी माफी मागतो. ती चूक होती, माधव यांनी ती मान्य करीत आपले विधान मागे घेतले आहे, असे सांगत नाईक यांनी वादाला महत्त्व देण्याचे टाळले. संबंधित मंत्र्याचे विधान तर्कसंगत असल्यामुळे हे प्रकरण आमच्यासाठी येथेच संपले असल्याचे उपराष्ट्रपती कार्यालयाने निवेदनात नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)