पाच राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती, बनवारीलाल पुरोहित तामिळनाडूचे नवे राज्यपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 02:44 AM2017-10-01T02:44:17+5:302017-10-01T02:45:08+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडू, बिहार, आसाम अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या पाच राज्यांसाठी राज्यपालांची आणि अंदमान, निकोबारमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडू, बिहार, आसाम अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या पाच राज्यांसाठी राज्यपालांची आणि अंदमान, निकोबारमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे बराच काळपासून तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंंत्री जयललिता यांच्या निधनानंतर या राज्यात कायमस्वरूपी राज्यपालांची मागणी होत होती.
पुरोहित यांच्या नियुक्तीमुळे तामिळनाडूला पूर्णवेळ राज्यपाल मिळाले आहेत. बनवारीलाल पुरोहित हे विदर्भातील नेते. १९७७ मध्ये ते राजकारणात सक्रीय झाले. १९७८ मध्ये ते नागपूर पूर्वमधून प्रथम आमदार म्हणून निवडून आले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सत्यपाल मलिक हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते काही काळ लोकसभा व राज्यसभा सदस्य होते. ते जनता दलाचे नेते होते. नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सध्या ते भाजपाचे उपाध्यक्ष होते. उत्तर प्रदेशातील जाटांचे नेते अशीही त्यांची ओळख होती. रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाल्यानंतर हे बिहारच्या राज्यपालांचे पद रिक्त होते.
बिहार विधान परिषदेचे माजी सदस्य गंगाप्रसाद यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर आसामच्या राज्यपालपदी जगदीश मुखी यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. जगदीश मुखी दिल्ली भाजपाचे नेते म्हणून ओळखले जातात. दिल्ली सरकारमध्ये त्यांनी अर्थ, नियोजन, अबकारी कर, कररचना व उच्च शिक्षण मंत्री म्हणून काम केले आहे.
एक अॅडमिरल, दुसरे ब्रिगेडियर
अॅडमिरल (सेवानिवृत्त) देवेंद्र कुमार जोशी हे आता अंदमान व निकोबारचे नायब राज्यपाल असतील. ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) बी. डी. मिश्रा अरुणाचलचे राज्यपाल असतील. नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार पहात होते.