राज्यपाल राव उपराष्ट्रपतीपदासाठी स्पर्धेत?

By admin | Published: July 17, 2017 02:03 AM2017-07-17T02:03:30+5:302017-07-17T02:03:30+5:30

येत्या ५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडीचा उमेदवार ठरविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक उद्या

Governor Rao wrestling for the Vice Presidential election? | राज्यपाल राव उपराष्ट्रपतीपदासाठी स्पर्धेत?

राज्यपाल राव उपराष्ट्रपतीपदासाठी स्पर्धेत?

Next

हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : येत्या ५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडीचा उमेदवार ठरविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक उद्या सोमवारी सायंकाळी दिलीत बोलाविण्यात आली आहे. केंद्रीय नगरविकास आणि माहिती व नभोवाणीमंत्री एम. व्यंकय्या नायडू हे या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे नावही चर्चेत असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
या सूत्रांनुसार पक्षात असा मतप्रवाह आहे की, उपराष्ट्रपतीपदासाठी दक्षिण भारतातील उमेदवार असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व राष्ट्रपतीपदाचे उमेदावर रामनाथ कोविंद उत्तरेकडील असल्याने उपराष्ट्रपतीपद देशाच्या दक्षिणेकडील राज्याकडे जावे, असे मत पक्षात तयार होत आहे.
आनंदीबेन पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले तेव्हा पक्षाने दिलेल्या काही कथित आश्वासनांमुळे कदाचित त्यांचेही विचारात घेतले जाईल, असे बोलले जात होते. पण आता असा विचार पुढे येत आहे की, रा. स्व.संघाची पार्श्वभूमी असलेला, कणखर व संसदीय कामकाजाचा अनुभव असलेला उमेदवार निवडला जावा. याच दृष्टीने व्यंकय्या नायडू व विद्यासागर राव यांची नावे पुढे आली आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी आदल्या दिवशी सत्ताधारी पक्षाने उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. ‘लोकमत’ने याआधी दिलेल्या बातमीनुसार राष्ट्रपतीपदाची निवडणूक उरकल्यावर उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा निर्णय घेण्याचे भाजपाने ठरविले होते. त्यानुसार उद्या सोमवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान दुपारी ३ वाजता संपले की सायंकाळी पाच वाजता संसदीय मंडळाची बैठक होईल.

Web Title: Governor Rao wrestling for the Vice Presidential election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.