राज्यपालांनी केली मंत्र्याची हकालपट्टी, निर्णयामुळे तामिळनाडूमध्ये वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 07:04 AM2023-06-30T07:04:44+5:302023-06-30T07:11:31+5:30
Tamil Nadu: ईडीने अटक केलेले तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना त्या राज्याचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे. तामिळनाडूच्या राजभवनाने ही माहिती दिली आहे.
चेन्नई - ईडीने अटक केलेले तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना त्या राज्याचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे. तामिळनाडूच्या राजभवनाने ही माहिती दिली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या शिफारसीशिवाय राज्यपालांनी ही कारवाई केली आहे.
राजभवनाने एका पत्रकात म्हटले आहे की, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. मंत्रिपदावर असलेले सेंथिल तपासावर प्रभाव पाडू शकतात; तसेच ते अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याचा निर्णय राज्यपाल आर. एन. रवी यांनी घेतला. व्ही. सेंथिल बालाजी हे ईडी तपास करत असलेल्या एका प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत
आहेत. (वृत्तसंस्था)
तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा राज्यपाल आर. एन. रवी यांना कोणताही अधिकार नाही. आम्ही या निर्णयाविरोधात कोर्टात जाऊ.
- एम. के. स्टॅलिन, मुख्यमंत्री
बालाजी यांना पदावरून दूर करण्याचा राज्यपालांना अधिकार कुणी दिला. ते वरिष्ठांना खूश करण्यासाठी अशाप्रकारे काम करत आहेत.
- सरवनन अन्नादुराई, नेते, द्रमुक